येमेन : येमेन मधील आदेन शहरातील विमानतळावर झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांना घेऊन विमान लँड झाले. त्यावेळी हा स्फोट झाला. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटाबाबत सरकारी प्रवक्त्यांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्फोटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे या स्फोटाची तीव्रता समजून येत आहे. अधिकृतपणे स्फोटाची जबाबदारी कुणी घेतलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्फोट कुणी घडवला हे अजून समोर आलेलं नाही. पण येमेनी प्रवक्त्यांनी इराणच्या पाठिंब्याने हुथी अतिरेक्यांवर संशय व्यक्त केला आहे.
सरकारच्या प्रतिनिधी मंडळातील कुणी दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी अजून तरी हाती आलेली नाही. मात्र घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी तिथं मृतदेह पडलेलं पाहिल्याचं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी आपली नावं जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. कारण त्यांनी माध्यमांशी अधिकृतपणे बोलणं अपेक्षित नव्हतं.
घटनास्थळावरून सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोजमध्ये विमानतळ परिसरात कोसळलेल्या वास्तूंचा ढिगारा आणि काचा दिसत आहेत. एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. आणखी एका फोटोमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत करताना दिसतो आहे. त्याचे कपडे फाटलेले आहेत.