अकलूज : अकलूज येथील रामायण चौकात कामावर असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीच्या कारणावरून भाजी विक्रेता व त्याच्या मुलाने जबर मारहाण केली. याबाबत ग्रामपंचायत कामगार गोविंद राजू साळवी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गोविंद साळवी हा अकलूज ग्रामपंचायतीकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे. रामायण चौक येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यामुळे तेथे कंटेनमेंट झोन घोषित करून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास भाजी विक्रेता शिवाजी
कृष्णा चव्हाण (रा. अकलूज) हा आपली पॅजो (एमएच ४५ एई०१६९) गाडी घेऊन तेथे भाजी विक्रीसाठी आला व कंटेमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यास गोविंद साळवी याने मनाई करताच त्याने त्याचा मुलगा कुणाल चव्हाण यास बोलावून घेतले व दोघांनी मिळून शिवीगाळ करत गोविंद यास हात पिरगाळून मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचारी शिवरत्न लोंढे व खलील शेख हे तातडीने तेथे आले व भांडण सोडवून गोविंद यास पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथून गोविंद यास उपचाराकरीता दवाखान्यात नेण्यात आले. भाजी विक्रेत्यास व त्याच्या मुलास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोहेकॉ. संतोष मोरे करत आहेत.
“कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणार्या ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यास केलेली मारहाण निंदनीय आहे. आरोपींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती अकलूज पोलिसांना करण्यात आली आहे. नागरिकांनीही संयम न सोडता ग्रामपंचायत कर्मचार्यांना सहकार्य करावे. सर्वांच्या समन्वयानेच आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत.”
– शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सरपंच, अकलूज