मुंबई : अदानी समूहाच्या ऊर्जा व्यवसायाचे बाजारमूल्य दोन वर्षांत तब्बल तिपटीने वाढले आहे. यामुळे हा समूह ऊर्जा क्षेत्रात जगातील पहिल्या वीसमध्ये आला आहे. या श्रेणीत स्थान मिळविणारा हा एकमेव भारतीय समूह आहे. ही भारताकरिता अभिमानाची बाब आहे.
देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसायांचे खासगीकरण सुरू असताना अंबानी यांचा रिलायन्स व अदानी समूहाची चर्चा वारंवार होते. यापैकी अदानी समूहाच्या ऊर्जा व्यवसायाचे बाजारमूल्य मागील दोन वर्षांत तिपटीहून अधिक वाढले आहे. एका अहवालात हे समोर आले आहे.
या अहवालानुसार, दोन वर्षांपूर्वी या समूहातील ऊर्जा विभागाचे बाजारमूल्य जवळपास ६.५० अब्ज डॉलर (सुमारे ४८ हजार कोटी रुपये) होता. ते आता ३१ अब्ज डॉलरवर (सुमारे २.३२ लाख कोटी रुपये) गेले आहे. यामुळेच हा समूह या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत पहिल्या वीसमध्ये आला आहे. अवघ्या दोन वर्षांत समूहाचे बाजारमूल्य तब्बल तिपटीने वाढल्याने उद्योगजगतात आश्चर्य व्यक्त होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या पाच वर्षांत देशातील पारेषण व्यवसाय ४ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. तसेच वीज वितरण क्षेत्रात ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ही एक मोठी संधी देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील उद्योगांसाठी असेल. त्यानुसार यामध्ये काम कायम राखल्यास हा समूह जगातील पहिल्या १० मध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
* ‘ग्रीन एनर्जी’ची क्षमता वाढणार
केंद्र सरकारने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीच सोलार पॅनलसह अन्य उपकरांवरील आयात शुल्क वाढवून स्वदेशी पॅनलना बळ दिले जात आहे. या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र अर्थात ‘ग्रीन एनर्जी’ची क्षमता येत्या दहा वर्षांत तीनशे ते चारशे गिगावॉटने वाढण्याची शक्यता आहे. याबाबत अदानी समूहाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची क्षमता ३१७५ मेगावॉट असून ११ हजार पाचशे मेगावॉट क्षमतावाढ होत आहे.