नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२ काही दिवसांतच सुरु होणार आहे. नुकत्याच झालेल्या बजेटच्या घोषणांना शेअर बाजारानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर्षी गुंतवणूक करताना कोणत्या क्षेत्रांवर आणि त्यांच्या स्टॉक्सवर नजर ठेवावी याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
या गुंतवणुकीची माहिती एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट ज्योती रॉय यांनी दिली आहे.
* बीएफएसआय : बीएफएसआय सेक्टरला, विशेषत: पब्लिक सेक्टर बँकांना बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. त्यापैकी २०,००० कोटी रुपये तणावाखालील मालमत्तांसाठी बॅड बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी व सहकार्यासाठी देण्यात आले. किफायतशीर गृहनिर्माणसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना १ वर्षाची अतिरिक्त कर सवलत मिळाली. तसेच डिस्कॉमना कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांसाठी डिस्कॉम-आधारीत योजनांकरिता पुढील ५ वर्षांसाठी ३.०५ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
– स्टॉक्स : एसबीआयएन, बीओबी, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, कॅनफिन होम, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरईसी.
* औषधनिर्मिती : आरोग्य सेवेसाठी यावर्षी अर्थमंत्र्यांनी वित्तवर्ष २०२२ मध्ये २,२३,८४६ कोटी रुपये असा दुप्पट निधी राखून ठेवला. कोरोना-१९ च्या लसीकरिता ३५,००० कोटी रुपये अतिरिक्त वितरित केले, तसेच यात आणखी वाढ करण्याची तयारीही दर्शवली.
-स्टॉक्स: अपोलो हॉस्पिटल, नारायण हृदयालय, कॅडिला आणि सिप्ला.
* मौल्यवान धातू, रत्ने आणि दागिने: सोने व चांदीवरील सीमा शुल्क १२.५% वरून ७.५% कमी करण्यात आले असले तरीही कृषी पायाभूत व विकास उपकर सोने, चांदी व डोअर बार्सवर लावण्यात आला आहे. सिंथेटिक कट आणि पॉलिश केलेले स्टोन (रत्ने) यावर सरकार १५% सीमा शुल्क आकारले. यापूर्वी ते ७.५% आकारले जात असे. या निर्णयांमुळे भारतातील दागिने बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे.
– स्टॉक्स: टायटन कंपनी व वैभव ग्लोबल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वस्त्रोद्योग : पीएलआय योजनांसह, सरकारने टेक्स्टाइल पार्कमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली. नायलॉन चिप्स, नायलॉन फायबर, कॅप्रोलॅक्टम आणि धाग्यावरील सीमाशुल्क ७.५% वरू ५% वर केले. या निर्णयमामुळे भारतीय वस्त्रोद्योग कंपन्यांमध्ये विविध जागतिक पातळीवर यशकथा लिहिल्या जाऊ शकतात.
-स्टॉक्स: सियाराम सिल्क मिल्स, अरविंद लि. आणि वर्धमान टेक्स्टाइल्स.
* सौरपंप : भारत स्वच्छ व हरित भविष्याकड़े वाटचाल करत असताना, प्रगती करणाऱ्या हरित क्षेत्रांचा तुमच्या पोर्टफोलिओत समावेश करणे आवश्यक आहे. या वर्षी सरकारने सौर कंदील व सौर इन्व्हर्टर्सवरील सीमाशुल्क ५% वरून अनुक्रमे १५% ते 20% वाढवले आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि काही अग्रेसर कंपन्यांसाठी हा निर्णय लाभदायक ठरेल.
-स्टॉक्स : शक्ती पंप्स आणि क्रॉप्टन ग्रीव्ह्स कंझ्युमर इलेट्रिकल्स.