मुंबई : अभिनेत्री पूजा सावंतचा बळी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता स्वप्नील जोशीसह ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यावरून पूजा या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट होतंय. विशाल फुरीयान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट येत्या १६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
आगामी मराठी ‘बळी’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून हा एक भयपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांसमोर आला होता. टीजर प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला होता. टीजरमध्ये अनेक भीतीदायक दृश्य दाखवण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री पूजा सावंत हिचा ‘बळी’ या चित्रपटातील लुक प्रेक्षकांसमोर आला आहे. तिचा चित्रपटातील लुक जरा वेगळा आणि गंभीर दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पूजाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे, ज्यात ती मागे वळून पाहताना दिसत आहे. जणू तिला मागून कुणीतरी हाक मारली आहे.
शिवाय तिच्या हातात स्थेथोस्कोपही आहे. त्यावरून ती या चित्रपटात एका डॉक्टरची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. पूजाच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी आणखी माहिती मिळू शकली नसली तरी ‘लपाछपी’ या चित्रपटानंतर ‘बळी’ चित्रपट पूजाचा दुसरा भयपट असणार आहे. पूजाने शेअर केलेल्या पोस्टरवर देखील कोण आहे एलिझाबेथ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहात गेल्यावरच मिळणार आहे.
चित्रपटाची निर्मिती जीसिम्स निर्मिती संस्थेने केली असून चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरीया यांनी केलं आहे. पूजाच्या ‘लपाछपी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. प्रेक्षकांना घाबरवत त्यांना आश्चर्याचे धक्के देत हा चित्रपट त्यांना जागीच खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरला होता. या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांची तशीच अपेक्षा आहे. हा चित्रपट १६ एप्रिल रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.