काबूल : काबूल विमानतळाबाहेर ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. देशातून बाहेर पडण्याच्या अपेक्षेने अनेक नागरिक विमानतळाबाहेर जमा झाले आहेत. काबूल एअरपोर्टवर तालिबान्यांनी गोळीबार केला होता. त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोक बिथरले आणि सैरावैरा पळू लागले. यातून झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत आहे. त्यामुळे अफगाणी जनता देशाबाहेर पडत आहेत. मोठी पळापळ चालू आहे, व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाकडे पळत आहेत. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘काबूल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. “अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे.” असं ब्रिटीश लष्कराने सांगितलं आहे.
तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी पळापळ करत आहेत. काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घातलं आहे. परंतु काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकत आहेत. काही मुले कुंपणांमध्येच अडकून पडली आहेत. सैनिकांनी मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही मुलं तारांमध्येच अडकून पडल्याचं म्हटलं जात आहे.