बार्शी : पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश भारत मांजरे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी एका तासात चोरीस गेली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अविनाश मांजरे हे मूळ तालुक्यातील देवगाव येथील रहिवाशी आहेत. ते सध्या शहरातील फुले प्लॉट येथे रहावयास आहेत. त्यांच्याकडे हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच 13-सीएन-8593 होती. ती त्यांनी आपल्या घरासमोर असलेल्या झाडाखाली दुपारी 12 वा. लावली होती.
त्यानंतर तासाभराने बाहेर जाण्यासाठी त्यांनी गाडी बघितली तर ती गायब झाली होती. त्यामुळे त्यांनी आसपास शोध घेतला पण सापडली नाही. त्यानंतर मित्रांकडे, नातेवाईकाकडे, शहरामध्ये चौकशी केली मात्र गाडीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे गाडी चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
* बसमधील महिला प्रवाशीकडील पाच लाखाचे दागिने पळविले
बार्शी : लातूर-सातारा बसमधून एकट्याने प्रवास करणार्या महिलेजवळील सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने तीन महिलांनी अत्यंत शिताफीने पळविले.
याबाबत रुपल हितेश लोया (रा- 237, सोमवार पेठ, दत्तप्रसाद अपार्टमेंट, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रुपल लोया यांचे माहेर लातूर येथील असून सासर सातारा येथे आहे. त्या घरगुती कार्यक्रमानिमित्त लातूर येथे आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या लातूर-सातारा या बसने सकाळी 8.15 च्या सुमारास परत निघाल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी आपल्याजवळील सुमारे 15 तोळ्याचे विविध दागिने लेडिज पर्स मध्ये ठेवून बॅगेत ठेवले होते. बॅग त्यांनी सीटखाली ठेवली होती. ढोकीमध्ये बसमध्ये तीन महिला चढल्या. त्यातील एक त्यांच्या शेजारी व एक समोर बसली. तिसरी सीट जवळ उभी राहिली.
त्या तिघी त्यांना दाटीवाटी करत होत्या. त्यातील एकीने पैशाची नाणी खाली पाडली. आणि ती गोळा करण्याच्या बहाण्याने त्यांना बसलेल्या जागेवरुन उठवून बॅगेपासून दूर केले. त्यानंतर येडशीच्या पुढे आल्यानंतर बस प्रवाशांना नाष्टा करण्यासाठी थांबली असता बॅग बस मध्येच ठेवून त्या फ्रेश होण्यासाठी खाली उतरल्या होत्या. त्यांना परत या महिलांनी लवकर चढू दिले नाही. आडकाठी केली. त्यामुळे त्यांना त्यांचा संशय आला. मात्र सोबत कोण नसल्यामुळे आणि घाबरल्यामुळे त्यांना आपली बॅग पूर्णपणे तपासता आली नाही. पुढे पांगरी थांब्यावर त्या महिला बसमधून उतरल्या. त्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता त्यांना दागिने गायब झाल्याचे आढळून आले.
चोरी झाल्याचे लक्षात येता, खात्री होऊनही घाबरुन त्या लागलीच पोलिसांकडे गेल्या नाहीत. सासरी गेल्यानंतर कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांनी पुन्हा पांगरी पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली.