वृत्तसंस्था : युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी बहिष्कार घातला आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या उत्पादनांची विक्री आणि सेवा रशियामध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ते युक्रेनला मदत करणार आहेत. कंपनीची सायबर सुरक्षा टीम युक्रेनसोबत काम करणार आहे. शांतता स्थापन करण्यासाठी त्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने रशियाच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे सर्व उत्पादने रशियाला निर्यात करणे बंद केले आहे. कंपनीच्या ईमेलद्वारे सॅमसंग प्रतिनिधीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्याच्या भौगोलिक राजकीय घडामोडींमुळे रशियाला शिपमेंट निलंबित करण्यात आली आहे.
कंपनीने म्हटले आहे की, आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्व लोकांबरोबर आहेत आणि आमचे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. निर्वासितांच्या मदतीसह संपूर्ण प्रदेशात मानवतावादी प्रयत्नांना पाठिंबा देण्याची आमची योजना आहे. यासाठी, आम्ही 6 दशलक्ष डॉलर देणगी देणार आहोत. कंपनीच्या या निर्णयाचा रशियाला मोठा फटका बसणार आहे.
कंपनीचे स्मार्टफोन्स तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने आता रशियाला मिळणार नाहीत. या निर्णयामुळे सॅमसंग आता युक्रेनमधील लष्करी कारवाईनंतर रशियामध्ये आपल्या उत्पादनांची नवीन विक्री थांबवणारी कंपनी बनली आहे. Samsung, Microsoft boycott Russia; Apple suspends sales in Russia
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
Apple, FIFA आणि Cyberpunk 2077 डेव्हलपर सीडी प्रोजेक्ट या काही कंपन्यांनी रशियामध्ये विक्री थांबवली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे.
या कंपन्यांनी आता रशियाला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या रशियावरील आर्थिक निर्बंधांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वेगळ्या प्रकारच्या कारवाईस आता रशिया कसे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मायक्रोसॉफ्टची ऑपरेट सिस्टम सध्या जगभरात एक अब्जाहून अधिक जण वापरतात. रशियामधील विक्री आणि सेवा बंद झाल्यामुळे लाखो वापरकर्ते प्रभावित होतील. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जगातील इतर देशांप्रमाणेच आम्हीही युक्रेनमधील युद्धाच्या बातम्यांमुळे भयभीत, संतप्त आणि दु:खी आहोत. आम्ही रशियाच्या या अन्याय्य आणि बेकायदेशीर आक्रमणाचा निषेध करतो.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक कंपन्यांनी रशियावर बंदी घातली आहे. आता आयफोनचे उत्पादन करणाऱ्या ॲप्पल कंपनीने आपल्या सर्व उत्पादनांची रशियात होणारी विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनमधील परिस्थितीने आम्ही चिंतेत आहोत आणि पीडितांच्या सोबत आहोत, असे ॲप्पलने स्पष्ट केले आहे. ॲप्पल पे अन् ॲप्पल मॅप सेवाही बंद आहेत. याशिवाय ऊर्जा कंपनी एक्सॉनमॉबिलने रशियातील काम बंद केले आहे.