¤ ‘खाकी’ वर्दीवरच्या संतापाचा राग निघाला
¤ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेड काढण्यावरून रस्ता हायजॅक
¤ रात्री उशीरापर्यंत पोलीस चौकीत दावे – प्रतिदावे
–Solapur. Youths in the crowd slapped the police officer on the cheek
सोलापूर : आसरा चौक ते विजापूर रस्ता ( व्हाया टिळक विद्यापीठ पाण्याची टाकी जाणारा मार्ग….) रात्रीचे साठेआठ वाजलेले… रस्त्यावर मोठी वर्दळ… पोलीस चौकीसमोर माणसांची गर्दी…वहातुकीची कोंडी….भांडणाचा आवाज… रस्त्यावरचा प्रत्येकजण नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी पुढे सरसावत असलेला…बराच वेळ गोंधळ उडालेला….महिलांचा जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागलेला… बऱ्याच वेळानंतर पोलीस आलेले…एक तरूण त्याचे आई वडिल आणि खाकीवर्दीमधील एक अधिकारी आणि त्यांच्या परिवाराला पोलीसांनी आत घेऊन दरवाजा लावत … उपस्थित जनसमुदाय हटवण्यासाठी खाकीवर्दीच्या भाषेत दम देणं सुरू ठेवलेलं.
रविवारी (ता. 25) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जुळे सोलापूर परिसरातील डी मार्ट पाण्याच्या टाकी जवळच्या विजापूर नाका पोलीस ठाणे अंकित पोलीस चौकी आहे. या चौकीजवळ हा राडा सुरू होता. सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पत्नी या भागातील एका दुकानात खरेदीसाठी आलेल्या होत्या.
खरेदीदरम्यान एका मुलाने त्यांची छेड काढली असं या पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. या अधिकाऱ्याच्या पत्नीने छेडछाडीचा हा प्रकार आपले पती घरी आल्यानंतर सांगितला. त्यावर हे पोलीस अधिकारी संतापले, आपल्या परिवाराला घेऊन जाब विचारण्यासाठी ते आले.
एका दूकानात जाऊन त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल एका मुलास हटकले, तेव्हा या मुलाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अरे – तुरे ची भाषा केली. व्यवस्थित उत्तर दिले. त्यावर चिडलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांनं त्या मुलाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली, असं उपस्थित नागरिकांचा खास करून रस्त्यावरील विक्रेते यांचं म्हणणं होतं.
छेडछाड केली नसताना, तरुणाला विनाकारण मारहाण केली म्हणून, भाजी अन् फळ विक्रेते शिवाय अन्य व्यावसायिक संतापले. या पोलीस अधिकाऱ्याला आणि त्यांच्या परिवाराला घेराव घातला, या दरम्यान येथे राडा सुरू झाला. बघ्यांची मोठी गर्दी जमली. विक्रेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी गर्दीमध्ये उपस्थितांपैकी काही तरुणांनी त्या अधिकाऱ्याला मारहाणही केली. संबंधित पोलीस अधिकारी सर्वांना घडला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण चिडलेला जनसमूदाय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत बराच वेळ नव्हता. भाजी आणि फळ विक्रेत्या महिला या पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत होत्या. अंगावर मारण्यासाठी धावून येत होत्या. असा प्रकार बराच वेळ चालू होता. पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकारासंदर्भात फोन लावून सांगत होता.
या दरम्यान पोलीस चौकीतील पोलीस कोणीच उपस्थित नव्हते. भर रस्त्यावर हा गोंधळ सुरू होता. पुढे खुप वेळांनी चौकीचे पोलीस तिथे धावले. राञी उशीरापर्यंत चौकीत या संदर्भात दावे – प्रतिदावे सुरू होते.
□ …तर मी निघून जातो
ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या बाबतीत छेछाडीचा प्रकार झाला होता, ते पोलीस अधिकारी उपस्थित जनसमुदायाला विशेषतः व्यावसायिकांना तसेच त्यांनी जमवलेल्या तरुणांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते, माझ्या पत्नीच्या बाबतीत छेडछाडीचा प्रकार झाला आहे, तसाच प्रकार तुमच्या पत्नीच्या बाबतीत झाला असता, तर तुम्ही ते सहन केलं असतं का ? पोलीस अधिकारी म्हणून आम्हाला न्याय नाही का ? असं तो अधिक प्रांजळपणे म्हणत होता. माझं चुकीचं आहे असं सांगा, मी येथून निघून जातो असे ते पोलीस अधिकारी म्हणत होते. पण त्यांच्या या म्हणण्याकडं कोणी लक्ष देत नव्हतं. उलट त्यांच्या अंगावर तरूण जात होते, या दरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडावर गर्दीतून तरुणांनी चापटा मारल्या.
□ विनाकारण मारहाणीचा आरोप
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची छेडछाड केली गेली नाही, ज्याच्यावर छेडछाडीचा आरोप झाला, तो तरुण छेडछाड करणाऱ्यापैकी नाही, तरी पण पोलीस अधिकाऱ्याने, आपल्या खाकीवर्दीच्या जोरावर त्याला विनाकारण मारहाण केली, त्या तरुणाची कोणतीही चूक नव्हती असा दावा फळ आणि भाजी विक्रेते तसेच अन्य व्यवसायिकांकडून या दरम्यान केला गेला.
□ गुन्हा दाखल नाही
यासंदर्भात विजापूर नाका पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता, तेथून अशी माहिती सांगण्यात आली की, रात्री झालेल्या भांडणाचा कॉल आमच्या पोलीस ठाण्याला आला होता. त्यावेळी आम्ही तात्काळ पोलिसांना पाठवून दिले. यासंदर्भात सध्या कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.