बार्शीत कसब्यातील पाटलांची तुकाईदेवी, एकविराई गल्लीतील एकविराआई, भवानीपेठेतील तळावरची अंबाबाई, बुरुड गल्लीमधील खडकावरची देवी अशी देवीची प्रमुख मंदिरे असून, पारंपरिक पद्धतीने साजरा होणा-या या बार्शीतील महोत्सवामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. Tukaidevi Navratri of Mana in the town of Barshi
बार्शी शहरात माळीगल्ली, महाद्वार चौक, सावरकर चौक, सावळे गल्ली, डंबरे गल्ली, बडवे गल्ली, सोलापूर रस्त्यावरील, शिवाजी आखाडा, तेलगरणी चौक आदी प्रमुख व जुनी नवरात्र महोत्सव मंडळे मोठ्या उत्सहात नवरात्र साजरा करतात. भगवंताची बार्शी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बार्शीतील कसब्यातील ‘तुकाईदेवी’ येथील मंडलीक-पाटील कुटुंबियांचे कुलदैवत तर बार्शीकरांचे श्रद्धास्थान आहे.
इ.स.सन 17 च्या आसपासचा या मंदिराचा इतिहास आहे. पाटील कुंटुंबियाच्या पाच पिढ्या या देवीची पूजा-अर्चा करीत आल्या आहेत. त्यामुळे कसब्यातील ‘पाटलांची देवी’ म्हणूनही या देवीला ओळखले जाते. अगदी परंपरेनुसार ठरलेल्या मानकऱ्यांच्या उपस्थितील येथे नवरात्र महोत्सव साजरा केला जातो.
गेल्या सहा-सात वर्षात पाटील कुटुंबियांनी स्व:खर्चाने मंदिराचा जिर्णोद्धार केल्यामुळे मंदिर परिसराला शोभा प्राप्त झाली असून, प्रशस्त आणि प्रसन्न वातारण निर्माण झाले आहे. बार्शी हे अनेक कारणांनी प्रसिद्ध असलेले व्यापारी शहर आहे. बार्शीतील मंदिराचा विचार करता बार्शीला मंदिराचे शहरही म्हणता येईल.
‘श्री भगवंता’मुळे पावण समजल्या जाणार्या बार्शीतील कसब्यातील ‘तुकाईदेवी’ अनेकांचे श्रद्धास्थान आहे. येथील मंडलिक- पाटील परिवाराच्या पाच पिढ्या परंपरेनुसार मानकऱ्यांच्या सहकार्यातून नवरात्र मोहोत्सव साजरा करीत आला आहे. त्याच बरोबर शहरातील लाकुड तळावरची देवी, बुरुड गल्लीतील खडकावरची देवी येथील नवरात्र महोत्सवामुळे शहरात विशेष उत्साहाचे वातारण निर्माण होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला की, कसब्यातील तुकाईदेवी मंदिर परिसरातील वातावरण पालटून जाते. घटस्थापनेसाठी लागणारे धान्य, आंब्याची पाने अनेक शेतकरी मोठ्या श्रद्धेने देवीला आणून देतात. अनेक भाविक मंदिरातून घटस्थापनेसाठी साहित्य घेऊन जातात. नवरात्रात मोहोत्सवात तुकाईदेवीची वेगवेगळ्या रुपातील पूजा बांधली जाते. प्रत्येक दिवशी वेगळवेगळ्या रुपातील आणि विविध वाहनावर देवी विराजमान केली जाते. त्यासाठी हत्ती, घोडा, मोर, सिंह, नंदी आदी वाहणांचा समावेश असतो. अनेक भाविकांना आज कोणती आरास केली; याची उत्सुकता असते.
दररोज सकाळी सनई-चौघडा आणि रात्री आराध्याची गाणी यामुळे वातारण भक्तीमय होऊन जाते.
पाचव्या माळेपासून महिलांची विशेष गर्दी होते ती देवीची ओटी भरण्यासाठी, त्याच बरोबर कडकण्या देवीला वाहिल्या जातात. शिवाय याच काळात देवीला मोठ्या प्रमाणात सवाद्य दंडवत येतात. काही सामाजिक मंडळे परंपरेनुसार सवाद्य देवीला हार आणतात. सातव्या माळेला देवीची काटी निघते. काटी नेण्याचा मान परिट समाजाकडे आहे.
आष्टमीला देवीचा छोटा डोक्यावरच छबीना निघतो. या दोन्हीचा मार्ग ठरलेला आहे. इकविराई मंदिर, मंगळवार पेठ, जुनीचाटे गल्ली, महाद्वार चौक, माळेगल्ली, डंबरे गल्ली, सुतारनेट, बेदराई गल्ली मार्ग काटी आणि छबीना परत येतो. आष्टमीचा छबीना परत आल्यानंतर होमपूजा सुरू होते. यावेळी कवाळ्याचा बळी दिला जातो. याचा मान सुतार पाटलांचा आहे.
आष्टमीच्या पुजेचा मान वालुपंते यांचा आहे. पुजेनंतर येथील उपरे आणि फटाले मंडळी देवीसमोर पोत खेळतात. अष्टमीला देवीची पालखी बाहेर मंडली जाते. दस-यादिवशी देवीचा पालखी सोहळा हा मुख्य कार्यक्रम असतो. पाच वाजता देवीची पालखी निघते. ती वेशीत येथे आणी तेथून ही पालखी मानाचे पाटील यांना घेऊन परांडा रस्त्यावरील भैरुबाच्या मंदिरात जाते आणि तेथून मंदिरात येते. पालखी आल्याशिवाय सिमोल्लंघनाला जायचे नाही; असा पालखी मार्गावरील अनेकांची प्रथा आहे. ती अजूनही पाळली जाते.
सिमोल्लंघणानंतर रात्री आराधी ऊदकार घालून देवीला झोपवतात. त्यानंतर अश्विन पोर्णिमेपर्यंत मंदिर बंद असते. अश्विन पोर्णिमेला देवीला ऊदकार घालून उठविले जाते. त्यावेळी मंदिरात कापूर ओळीने मांडून तो पेटविला जातो. त्यानंतर देवीच्या अंगावर दही-दूध पडते. त्याच दिवशी दुपारी मानकरी, आराधी आणि परड्या भरण्याचा कार्यक्रम होऊन रात्री देवीची सवाद्य मिरवणूक निघते. एकूणच ‘तुकाईदेवी’च्या या उत्सवात परंपरेला आणि श्रद्धेला महत्त्व दिले जात.