□ सहिष्णूता या हिंदू संस्कृतीच्या शिकवणीतून समतेचे दर्शन
आज दिवाळीचा पाडवा. हा मांगल्याचा आणि उत्साहाचा सण वरुण राजाच्या बरसातीने हिरव्या अलंकाराने नटलेली धरणीमाय …बळीराजाच्या कष्टातून काळ्या आईच्या उदरात उगवलेले धान्य इंद्राच्या कृपेने नद्या-नाले, ओढे, विहिरी, तळे याठिकाणी प्रसन्न करणारी गंगा…सर्वत्र नवीन खरेदी विक्री. असे चित्र या दिनी पाहायला मिळते. Deepsurajya Ujat Raho; ‘360° Solapur’ and ‘Deepsurajya’ La Solapurchi Dad Diwali Padwa Vardhapan
या पाडव्याकडे जसे आध्यात्मिक महत्व म्हणून पाहिले जाते, तसे अर्थकारण म्हणूनही त्याकडे बघितले जाते. कोरोनाचे संकट गेल्यानंतर दोन वर्षानी असा आनंदाचा माहोल सर्वत्र दिसत आहे. यंदा अति अति मुबलक पाऊस झाल्याने ग्रामीण भागात आनंदी आनंद तर आहेच शिवाय शहरांमध्ये उत्फुल्ल वातावरण आहे. दरवर्षीची दिवाळी चार दिवसांची असते पण यंदा दोनच दिवस आली. तरीही लोकांनी ती आनंदाने साजरी करत आहेत.
गुढी पाडवा ते दिवाळीचा पाडवा अशा सहा महिन्यांच्या कालावधीत सण-उत्सव यांची रेलचेल असते. त्यातून जी खरेदी-विक्री होते, त्यातून मोठे अर्थकारण घडत असते. त्यामुळे व्यापारी, उद्योजक व लहान-सहान विक्रेते यांच्याही जीवनात हे सण बदल घडवून आणतात. त्यांना रोजगार देत असतात. अशा उत्सवांमध्ये जात-पंथ धर्म हा भेदभाव बिलकूल नसतो. उलट समतेचे दर्शन पडते. कारण सहिष्णूता ही हिंदू संस्कृतीची शिकवणच आहे. या पाडव्याच्या निमित्ताने आम्हाला आमच्या काही भावना आपल्यासमोर ठेवायच्या आहेत.
दैनिक सुराज्यने गेल्या महिन्यात एकविसाव्या वर्षात पदार्पण केले. माणसाचे वय कसे वाढत जाते हे त्यालाही कळत नसते. वीस वर्षांपूर्वी आम्ही या प्रबोधनाचे रोपटे लावले. त्याचे वृक्षात कसे रूपांतर होत गेले हे आम्हालाही कळले नाही. यंदाच्या वर्धापन दिनानिमित आणि शुभ दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आम्ही काही अभिनव संकल्प केले. सुराज्यच्या वाढदिनाप्रसंगी आम्ही ३६०° सोलापूर ही एक वैचारिक मेजवानीची संकल्पना सोलापूरपुढे आणली. सोलापूर हे एक खेडे आहे, अशा शब्दात आपलेच लोक आपल्याला हिणवायचे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पुणे-बेंगलोर या शहरांचे फॅड आजच्या पिढीत घुसले आहे. त्याचा विचार करून सोलापुरात काय नाही? सोलापूर पूर्वी काय होते आणि आता इथे काय आहे ? हे त्या मेजवानीतून दाखवून द्यायचे होते. त्यासाठी सोलापुरातील साहित्यिक, व्यापारी, उद्योजक, अर्थतज्ञ, कवी, शिक्षण तज्ञ यांना सोलापूरविषयी लेखन करण्याचे आवाहन केल्यानंतर सा-यांनी दै. सुराज्यला भरभरून प्रेम दिले.
३६०° सोलापूर या विशेषांकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांची लेखनशैली व सोलापूरविषयी दिलेली माहिती व भविष्याचे वेध येणारे चिंतन वाचल्यानंतर सोलापूर अजून टॉपमोस्टवर जाईल, असा विश्वास आम्हाला वाटतो. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अजून एक कल्पना समोर आणली प्रसार माध्यमांकडे समाजाचा आरसा म्हणून पाहिले जाते.
आज डिजिटल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. जगाच्या पाठीवर पडणारी एखादी घटना वा प्रसंग अर्ध्यामिनिटात लोकांपर्यंत जात असतात. त्यामुळे प्रिंट मीडियापुढे काही आव्हाने उभी आहेत. त्यावर मात करून हा प्रिंट मीडिया वाचकांना नवनवीन व वेगळे काहीसे देण्याचा प्रयत्न करत असतो. डिजिटल मीडियाचा प्रभाव जरी वाढत असला तरी प्रिंट मीडियाची विश्वासार्हता समाजात कमी झालेले नाही.
रामप्रहरी अंक पाहिल्याशिवाय दिवसच जात नाही. त्यामुळे प्रिंट मीडियाचा दबदबा काय असतो हे आजच्या पिढीला दाखवून देण्यासाठी ‘दीपसुराज्य’ ही एक संकल्पना राबवली. त्यालाही कवि व साहित्यिकांनी अंतःकरणपूर्वक दाद दिली. त्यामुळे हा अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अत्यानंद होतो आहे. ‘३६०° सोलापूर’ आणि दीपसुराज्यला ज्यांनी ज्यांनी म्हणून दाद दिली, त्या सर्वांना शतशः धन्यवाद.
सोलापूरचे पर्यावरण प्रेमी डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मुखपृष्ठासाठी दिलेले छायाचित्र ही दीपसुराज्यची शिदोरी ठरली आहे. माणसाचे जीवन असो की, एखाद्या संस्थेची वाटचाल. त्यासाठी अर्थकारणही तितकेच महत्वाचे असते. पण सोलापूरसह पंचक्रोशीतील विविध संस्था, राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक या सर्वांनी वर्धापन दिनाला आणि दीपसुराज्य विशेषांकाविषयी आदरभाव व्यक्त करून आम्हाला पाठबळ दिले. हाही उल्लेख इथे करणे अगत्याचे ठरते.
सोलापूरसह पंचक्रोशीतील वाचकांच्या अपार प्रेमातून आणि संस्थांच्या पाठबळातून आमचे धाडस वाढले आहे. नवे प्रयोग करण्याची ताकतही मिळाली आहे. त्यातून दै. सुराज्यची घोडदौड अशीच होत राहील, अशी आशा यानिमित्ताने व्यक्त करतो आणि हा दीपसुराज्य सा-यांच्या जीवनात सदैव उजळत राहो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.
📝 📝 📝
दैनिक सुराज्य – संपादक / व्यवस्थापकीय संचालक