> दुरुस्तीसाठी निविदा काढली; पण कामाला अद्याप मुहूर्त लागेना
सोलापूर : कुठल्याची शहरातील रस्ते हे त्या शहराच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. त्यामुळे रस्ते सुस्थित आणि खड्डेमुक्त हवेत. तरच जनजीवन सुरळित राहणार आहे. नाहीतर नागरिकांची विविध आजार आणि अपघातातून सुटका नाही. Keep calm… the municipality is sleeping in the pit! Smart City or City of Potholes, Citizens Disappointed Solapur Repair Tender Time चांगले आणि खड्डेमुक्त रस्त्यासाठी महापालिका सतर्क असणे तितकेच महत्वाचे आहे. केवळ आणि केवळ रस्त्यांसाठी महापालिका विविध माध्यमातून मिळणाऱ्या कोट्यवधींचा निधी खर्च करते. पण हा निधी रस्त्यावर खर्च करते की कागदावरच राहतो ?, हा प्रश्न पडतो. फक्त खड्डे बुजवण्यासाठी झोनवाईज लाखों रुपयांचा निधी दिला जातो. पण त्याप्रमाणात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी होताना दिसत नाही. आजवर अनेक सामाजिक संघटनांनी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी केली. पण तरीची झोपी गेलेल्या महापालिकेला जाग येत नाही.. त्यामुळेच ‘शांत रहा… महापालिका खड्ड्यात झोपलियं’, असे म्हणावे लागत आहे.
सोलापूर शहरातील अनेक भागातील बहुतांश रस्ते गॅस लाईन बसवणे, केबल टाकणे यासह विविध कारणांसाठी कामासाठी खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या रस्त्यामुळे सोलापूरकर चांगलेच वैतागले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर स्मार्ट सिटी नाही तर खड्ड्यांची सिटी आहे, असे म्हणण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेल्या वर्षांपासून गॅसलाईन, रिलायन्स केबल, वोडाफोन, आयडीया आणि स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे अशा विविध कामांकरिता रस्ते खोदाईचे काम सुरू आहे. महापालिकेने सोलापूर शहरातील कामांसाठी रस्ते खोदण्याची परवानगी विविध कंपन्यांना दिली मात्र खोदकाम झाल्यानंतर संबंधित कंपनीने रस्ते दुरुस्त केले नाहीत. याबदल्यात महापालिकेने संबंधित कंपनीकडून रस्ते खोदाईचे पैसे भरून घेतले. मात्र रस्ते पूर्ववत केले नाही.
या खोदकामाप्रसंगी शहरातील अनेक ठिकाणचे ड्रेनेजलाईन फुटले, नळजोडणी तुटल्या आहेत. या तोडफोडीच्या दुरुस्तीवरून संबंधित कंपनी व महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वादावादी सुरू होती. प्रशासनाकडे आम्ही नुकसानापोटी रक्कम भरपाई भरूनच परवानगी घेतली असे कंपनीचे म्हणणे आहे तर महापालिका अधिकारी केवळ रस्ता दुरुस्तीपोटीची रक्कम भरून घेण्यात आल्याचे सांगत होते. यामुळे शहरातील खड्डे रस्त्यावर तसेच राहिले ते बुजवण्यासाठी मनपाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. या प्रकारात मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आणि सध्याही लागत आहे.
रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. महापालिकेच्या या कारभारामुळे शहरवासियांकडून रस्त्यांच्या दुरवस्था संदर्भात टीकेची झोड उठत आहे. नागरिकांचा संताप आणि विविध संघटना पक्षांच्या आंदोलनानंतर महापालिकेने गेल्या महिन्यात शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी दहा कोटींची निविदा काढली आहे. मात्र अद्याप या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे नियोजन महापालिका करत आहे, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशा परिस्थितीत महापालिका रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार?, असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे.
सोलापूर शहरात चार दिवसाआड सोलापूरकरांना पाणी मिळते. त्यामुळे रस्ते खोदाईमुळे अनेक सार्वजनिक व घरगुती नळाचे कनेक्शन तुटल्याने पाणी सुटलेल्या दिवशी रस्त्यावर पाणी होऊन माती चिखल असल्याने दुचाकी चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अशा अनेक समस्यांना सोलापूरकर सामोरे जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन या सर्व प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आहे ? असा संतापजनक सवाल महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सोलापूरकर विचारत आहेत.
● या रस्त्यावर आहेत खड्डेच खड्डे
शहरात जुळे सोलापूर, होटगी रोड, ७० फूट रोड, दत्त चौक, रेल्वे स्टेशन परिसर, मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, समाचार चौक, विजापूर वेस, बाराईमाम चौक, बाळीवेस, मंगळवार बाजार, राजेंद्र चौक आदी परिसरात रस्त्यावर खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे चालकांना आपले वाहन सावकाश चालावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सोलापूरमधील नागरिकांना याचा त्रास सहन करतच घर गाठावे लागत आहे.
● अपघाताला आमंत्रण
शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुलाना शाळेत सोडण्यासाठी व भाजीपाला घेण्यासाठी सकाळी बाजारात दुचाकीवरुन जावे लागते. शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. खड्ड्यातून गाडी नेताना अनेक वेळा अपघातही झाले आहेत असे शहरातील नागरिक दिनेश जाधव यांनी सांगितले.
● जीव मुठीत धरुन जावे लागते
शहरातील सर्व रस्ते खोदल्याने रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे. त्यामुळे सकाळी प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. सत्तर फूट येथील रोड तर संपूर्णपणे खड्ड्याचाच आहे. घरी जाताना जीव मुठीत घेऊन घरी जावे लागते. खड्ड्यातून वाहन चालवताना मणक्याचे आजारही उद्भवत आहेत याकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल युवक प्रसाद जोशी यांनी केला..
● खड्डे बुजवण्याचे काम लवकरच
शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात खड्डे बुजवण्याचे कामे सुरू होतील असे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी सांगितले.