नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला अन् आपलं गाव गाठलं. अशात मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांना देखील आता शेतात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. शेतात काम करायला मजूर नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने मजुरांना थेट विमानाचं तिकीट पाठवल्याची घटना समोर आली आहे.
पप्पन सिंह असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. पप्पन सिंह यांची मशरुमची शेती आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज आहे. पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटणा विमानतळावरून लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना होतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपूर गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करतात. कित्येक वर्षांपासून अनेक मजूर त्यांच्या शेतात काम करत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मजूर बिहारला आपल्या गावी निघून गेले. पप्पन सिंह यांनी या सर्व मजुरांसाठी पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट बूक करण्याचा विचार केला.
पुढील दीड महिन्यांपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही व्यावसायिकांनी मजुरांना परत बोलवण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकाने थेट विमानाची तिकिटे बुक केली होती. तिकिटे मजुरांना पाठवण्यात आली. बिल्डरने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली होती.