अमृतसर, 03 जून (हिं.स.) : देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी आता आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. गगनदीप सिंग असे या गुप्तहेराचे नाव असून तो पाकिस्तानात राहणाऱ्या गोपाल सिंग चावला नामक खलिस्तानी दहशतवाद्यामार्फत गोपनीय माहिती पुरवत होता.
याबाबत माहिती देताना पंजाब पोलिसांनी सांगितले की, काउंटर-इंटेलिजन्स-पंजाबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तरमतारण पोलिसांनी संयुक्त कारवाईत गगनदीप सिंग उर्फ गगन यालाअटक केली. गगन पाकिस्तानातील आयएसआय आणि खलिस्तान समर्थक गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात होता आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान लष्कराच्या कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करत होता. तपासात असे आढळून आले की गगन सैन्य तैनाती, सैन्याशी संबंधित हालचाली आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या इतर गोपनीय माहिती पाकिस्तानला देत होता. गगनदीप सिंग गेल्या 5 वर्षांपासून खलिस्तानी गोपाल सिंग चावला याच्या संपर्कात होता, ज्यांच्या माध्यमातून तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला होता.
पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, गगनदीपनेही पीआयओमार्फत पैसे घेतले होते. त्याने मोबाईल फोनद्वारे पीआयएला गुप्तचर माहिती दिली. याशिवाय, तो आयएसआय लोकांच्या संपर्कात होता. या संदर्भात पोलिसांनी तपशील मिळवला आहे. आरोपीविरुद्ध तरणतारण पोलिस स्टेशनमध्ये अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.