पुणे , 3 जून (हिं.स.)। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.फरार संशयित आरोपी निलेश चव्हाणला पोलिसांनी शुक्रवारी(दि.३०) नेपाळहुन अटक केली होती.त्यानंतर त्याला मंगळवार, ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज(दि.३) पुन्हा तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन आणि पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज(दि.३) आरोपी सासरा राजेंद्र हागवणे, दीर सुशील हगवणे आणि सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाण यांना बावधन पोलिसांनी कोर्टात हजर केले.पिंपरी चिंचवड पोलिसांना या तिन्ही आरोपीची एकत्रित चौकशी करायची असल्या कारणाने आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली.आरोपीच्या वकिलांनी यावेळी एकही नवीन मुद्दा नसल्याचे सांगितले आहे.
तर निलेशचा कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याचा अधिक तपास करायचा असून छळाच्या प्रकरणात निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपासायचे आहे. अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या युक्तिवादानंतर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे, आणि शस्त्र दाखवून धमकी देणे असे गंभीर आरोप निलेश चव्हाण याच्या विरोधात होते. तसेच त्याच्याकडून शशांक, लता आणि करिष्मा यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले होते. आता त्या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाचे चॅट्स मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्या अनुषंगाने पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती.
अजूनही काही पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या सगळ्या छळाच्या प्रकरणात निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंब यांचे काही आर्थिक व्यवहार होते का हे तपासायचे असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.