नाशिक, ५ जून, (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील कळवण – नाशिक मार्गावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात घुसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट बंगल्याच्या भिंतीवर आदळली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चालकासह चार महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून बंगल्याचाही काही भाग कोसळला आहे.
जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
—————