सोलापूर, 7 जून (हिं.स.)।
सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवारी सकाळी होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विमानसेवेचे सोलापूरकरांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दरम्यान नियोजन भवनात पत्रकार परिषद झाली. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पालकमंत्री गोरे म्हणाले, १ ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातील घोषणा करतील, असा विश्वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेचा लाभ सोलापूरला द्यावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
—————