सोलापूर, 17 जून (हिं.स.) : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे शिवसेना या तिघांची महायुती असल्याने आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठे नेते निष्ठा बाजूला ठेवून पक्ष सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्यांचा एकनिष्ठ कट्टर आणि जिवाभावाचा कार्यकर्ता पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसून येतोय. त्या या कार्यकर्त्याचे नाव आहे बळीराम काका साठे.शरद पवार आणि काका साठे यांच्यात केवळ दोन वर्षाचे अंतर आहे.
काका साठे हे शरद पवार यांचे अतिशय निष्ठावंत समर्थक आहेत. ज्यावेळी पक्ष अडचणीत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्ष पद घेतले आणि सांभाळले. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले.या निवडीमुळे काका साठे यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काका साठे यांच्या जागेवर मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली.