पुणे, 5 जुलै (हिं.स.) देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र अलिकडच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा कस कमी होत आहे.तो वाढविण्यासाठी शास्त्रशुद्ध नैसर्गिक शेतीची गरज आहे, असे मत देशाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात ‘शाश्वत कृषी संजीवनी’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ इंग्रजी पुस्तकाचे प्रा. अनिल व्यास यांनी अनुवाद केला आहे. डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद गडाख, खासदार मेधा कुलकर्णी, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, भारतीय किसान संघाच्या प्रांत उपाध्यक्षा स्नेहलता सावंत, सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्न करत असून, सेंद्रीय शेती, माती परिक्षण आणि बियाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. या पुस्तकाचा विद्यार्थी आणि संशोधकांना कृषी संशोधनात नक्कीच फायदा होईल.”
देशाच्या प्रगतीत कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,”रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरातून शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्याला जैविक शेतीकडे वळायला हवे. आधुनिकतेबरोबरच शाश्वत पारंपारिक शास्त्राचाही वापर व्हायला हवा.”
कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी भूमी सुपोषण होणे गरजेचे असल्याचे सांगत प्रा. वार्ष्णेय म्हणाले, “भारतीय शेतीचा २५ वर्षे अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या सर अल्बर्ट हार्वर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक लिहिले. त्यांनी नैसर्गिक शेतीचा आणि एकात्म कृषी संशोधनाचा केवळ पुरस्कार केला नाही तर इंदोरच्या होळकारांनी दिलेल्या ७५ एकर जमिनीवर कृषी संशोधन केंद्रही स्थापन केले.”