सोलापूर, 1 ऑगस्ट।
भारताची दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये वाढत्या भाविकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधा सुदृढ करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांनी मुंबईत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली.
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर—
-
महावितरण आणि महापारेषण विभागातील मंजूर व प्रलंबित कामांना हिरवा कंदील देण्यात आला,
-
शहरात होणाऱ्या चार प्रमुख यात्रांदरम्यान भाविकांसाठी आवश्यक त्या ठिकाणी विद्युत प्रकाशयोजना करण्यास मान्यता मिळाली,
-
शेतकऱ्यांसाठी सोलर कनेक्शन तसेच आवश्यकतेनुसार विजेची जोडणी देण्याचे आश्वासन मिळाले.
याशिवाय, ओव्हरलोड झालेल्या सबस्टेशनमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे, मुख्यमंत्री सोलर योजना व आरडीएसएस अंतर्गत प्रलंबित कामांना गती देणे, तसेच शासनाच्या निरंतर योजनेतून ६३ केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
आ. आवताडे यांनी सांगितले की, यासाठी लागणाऱ्या निधीची मागणीही बैठकीत करण्यात आली असून, ऊर्जा राज्यमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.