नवी दिल्ली, 8 ऑगस्ट – दिल्लीच्या निजामुद्दीन भागात गुरुवारी (7 ऑगस्ट) उशिरा पार्किंगवरील वादातून बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी (वय 42) याची हत्या करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.
गुरुवारी रात्री सुमारे 10.30 वाजता आसिफ याचं काही लोकांशी स्कूटी गेटसमोरून हलवून बाजूला पार्क करण्यावरून वाद झाला. वाद वाढताच आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
या प्रकरणी बीएनएस अंतर्गत एफआयआर क्रमांक 233/25 नोंदवण्यात आला आहे. अटक झालेल्या आरोपींची ओळख उज्ज्वल (वय 19) आणि गौतम (वय 18) अशी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी आसिफवर हल्ला करताना स्पष्ट दिसत असून, तो तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.