अमरावती, 9 ऑगस्ट –
मोर्शी येथील उपविभागीय राजस्व अधिकारी (एसडीओ) प्रदीपकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी उभी असलेल्या खाजगी कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे वैयक्तिक पिस्तूल चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पवार यांची गाडी (क्रमांक एमएच २९ एआर ६६००) शासकीय निवासस्थानी उभी होती. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ते अमरावतीहून मोर्शी येथे आले आणि गाडी निवासस्थानी ठेवून शासकीय वाहनाने वरुड येथे गेले. सायंकाळी ६ वाजता कार्यालयातील शिपाई दुर्गेश चारे गाडीपाशी गेला असता, समोरील काचेचा तुकडा तुटलेला आढळला. तातडीने पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी गाडीत असलेल्या वैयक्तिक पिस्तूल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
घटनेनंतर पवार यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अधिकृत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे.