कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे आज बुधवारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुईमधील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रभर त्याकाळी नाटकाचे दौरे केले होते. त्याकाळी गाजलेल्या नर्तकी या त्यांच्या नाटकाचे ३०० हून अधिक प्रयोग झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यशवंत भालकर दिग्दर्शित हायकमांड या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. आपली सम्पूर्ण ह्यात चित्रपट, नाटक या क्षेत्रात घालवल्यामुळे अखेरच्या काळात चित्रपट मिळत नसल्याने त्या निराश झाल्या होत्या. ‘धनगरवाडा’ हा त्यांनी शेवटचा चित्रपट केला होता. तसेच ‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्येही काम केले होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सलाम म्हणुन भालकर्स कला अकादमीने २०१५ मध्ये त्यांना ” चिञसेवा पुरस्कारा”ने सन्मानित केले होते.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, निनाद काळे, मिलिंद अष्टेकर, राजू राऊत, संग्राम भालकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
* या चित्रपटांमध्ये केले काम
मराठी चित्रपटांमध्ये चरित्र्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीला वेगळं व्हायचय मला,मुंबईची माणसं, प्रेम तुझा रंग कसा,अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या. त्यानंतर बाई मी भोळी,कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज,सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार, धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राज्याचे राज्य येऊ दे अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.