अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो शेतकर्यांची पिके पाण्याखाली गेली. तर अतिवृष्टीमुळे पशुधनाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे झालेले नुकसान हे एकूण तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या ३३ टक्के जमीन बाधीत झालेली आहे. यामध्ये जिरायत, बागायत आणि फळबाग अंतर्गत असे एकूण १ लाख ८ हजार ८११ एकर जमिनीवर पिकांची नासाडी झाली आहे. दुष्काळाचा शाप असलेल्या अक्कलकोट तालुक्यावर यंदा पावसाने घाला घातला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील ३९ हजार ४२४ शेतकऱ्यांची ८८ हजार ७९७ एकरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तर ६ हजार ८५४ बागायत शेतकऱ्यांच्या १६ हजार ६५१ एकर, तर १ हजार ४९६ फळबाग शेतकऱ्यांच्या ३ हजार ३६२ एकरावरील फळबागा उदध्वस्त झाल्या आहेत. ज्यांनी आयुष्याची शंभरी गाठली आहे, अशा या ज्येष्ठ व्यक्तींच्या मते आयुष्यात असा हा विपरीत प्रकार पहिल्यांदाच पहायला मिळाल्याचे सांगितले जात आहे.
पाच ते दहा वर्षातून कधीतरी मोठा पाऊस व्हायचा पण यंदा मात्र परतीचा पाऊस ऐतिहासिक बरसला आहे.त्याचबरोबर मराठवाड्यात पडलेल्या पावसामुळे पूर आला आणि परिणामी तालुक्यातील हरणा, बोरी, सीना आणि भीमा या चारही नद्या महापुराने वाहिल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे १५२ जनावरे वाहून गेली, तर ५१० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या आपत्तीमुळे तालुक्यातील २ हजार १६३ कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. २३ घरांचे पूर्ण नुकसान झाले तर १ हजार ६५७ घरे व झोपड्यांची अंशतः पडझड झाली आहे. याच बरोबर तालुक्यातील १ हजार २५ एकर जमीन ही पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली तर ६९० एकर जमिनीवर गाळ साचला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या महापुराच्या संकटात महावितरणचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये पावणेदोन कोटीचे विद्युत वितरण व पारेषण कंपनीचे नुकसान झाले असून,६१२ वीजेचे खांब पडले आहेत. ३७ डीपी पाण्यात होत्या. तर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० डीपी बंद पडल्या आहेत. यामुळे दोन सबस्टेशन बंद पडले आहेत तर २० मेनलाइन पोल पाण्यात वाहून गेल्या आहेत. नदी किनार्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार मोटारी त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
* …अन्यथा संकटाचा अंधकार
महापुरानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळीचे पाहणी दौरे झाले. कोणी पुलावर तर कोणी बांधावर येऊन सर्वांनी आश्वासन दिले. पण मदत मिळेपर्यंत शेतकरी कसा तग धरणार याचा मात्र विचार झाला नाही. सध्या तालुक्यात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे नुकसानीचा आकडा फार मोठा आहे. मदत सुद्धा तशीच भरीव मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या इतिहासात अशी प्रचंड नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच आली आहे. तालुक्याच्या एकंदर क्षेत्रफळापैकी ३३ टक्के जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे गांभीर्य लक्षात येते. पुन्हा पिके येतील, विजेचे खांब उभे राहतील मात्र ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांच्या जमिनी पुन्हा कसदार आणि जोमदार कशा होणार ? हा खरा प्रश्न आहे. तेव्हा दिवाळीच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली तर निदान आशेचा एक दिवा तरी लागेल. अन्यथा संकटाचा अंधकार या सर्व तालुक्यात पसरल्याशिवाय राहणार नाही.
संकलन : रविकांत धनशेट्टी, अक्कलकोट