अमरावती : आमदार रवी राणा यांना आजचा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस कारागृहात काढावा लागत आहे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.
खासदार नवनीत राणा या आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणं धरलं. त्यावेळी नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरु राहणार, असा निर्धार नवनीत राणा यांनी केलाय. तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.
अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, लॉकडाऊनच्या काळात आलेलं वीज बिल माफ करा या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढत रवी राणा यांना अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.