परभणी : कोरोना काळातील टाळेबंदीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वांचं लक्ष्य या निवडणुकांकडे लागलं असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील वेग घेऊन लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्याबद्दल भाकीत केलं आहे.
राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
२०१९ विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं ऐनवेळी भाजपची साथ सोडत विरोधी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सत्तेच्या गणितामुळं राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून दिला.