पप्पा कायमचे निघून गेले, मम्मी जेलमध्ये गेली
चिमुरड्या राजनंदिनी अन् अमृताचं पुढं काय होणार ?
कोण सांभाळ करणार ‘त्या’ निष्पाप जिवांचा? कोठे घडलं हे प्रकरण?
खास प्रतिनिधी
सोलापूर : मित्राचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षादेखील भारी मानले जाते. पण दोघांमधली मैत्री तशी दृष्ट लागण्यासारखी असावी लागते. जीवाला जीव देणारी, एकाच्या पायात काटा रुतला जर दुसर्याच्या डोळ्यातून आश्रु येणारी, कृष्णा-सुदाम्याच्या आदर्शप्रमाणे मैत्री असावी लागते. मैत्रितच गद्दारी आणि विश्वास घात असेल तर…होय, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा भूमीत मित्रानेच मित्राचा विश्वास घात करावा, त्यातून मित्राला आत्महत्येमधून स्वत:चे आयुष्य संपवावं लागावे, अशी अप्रिय घटना घडली आहे. मित्राने आपल्या मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवली. तिच्याशी प्रेमसंबंध जुळविले आणि घात केला, असाच प्रकार झाला आहे.
दरम्यान, मैत्रीमध्ये जो विश्वासघातकीपणा झाला, त्यातून आख्खं कुंटुंब उद्धवस्त झालं. राजा-राणीचा सोन्याचा संसार मोडला. जी घटना घडली त्यामधून जन्मदाता पिता आपल्या दोघी चिमुरड्यांना सोडून या जगातून कायमचा निघून गेला. तर संशयित दोषी आईला शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये जावे लागले. घडलेल्या भयंकर घटनेमधून दोघी चिमुरड्या आई-वडिलांविना पोरक्या झाल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवार (ता.4) सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अन् कुंटुंब उद्धवस्त होण्यासंबंधी जे काही घडले ते समोर आले. याप्रकरणी विश्वास भिमराव पवार (रा.वडाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीकृष्ण विश्वास पवार ( वय 32 रा. वडाळा ता. उत्तर सोलापूर) हा तरुण शेती व्यावसाय करीत होता. निकिता असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. राजनंदिनी (वय 3 ) आणि अमृता ( वय दीड वर्षे) या दोन मुली त्यांना आहेत. गावातील बालाजी भगवान पाटील हा श्रीकृष्ण पवार यांचा मित्र होता. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे बालाजी पाटील हा पवार यांच्या घरी अधूनमधून यायचा. पवित मैत्रीच्या नात्याला कलंक लावेल असे श्रीकृष्ण पवार यांना वाटले नव्हते.
मात्र,बालाजी पाटील याची वाईट नजर श्रीकृष्ण यांची पत्नी निकीता हिच्यावर पडली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मित्र बालाजी याने आपल्या पत्नीसोबत असं गैर वागणं श्रीकृष्ण याला अजिबात आवडत नव्हतं. मित्र बालाजी याने आपला विश्वासाने गळा कापला असं श्रीकृष्ण म्हणत होता. दरम्यान याच टप्यावर बालाजी आणि निकिता यांच्या अनैतिक संबंधाची पर्यायाने प्रेम प्रकरणाची वाईट चर्चा गल्लीत, गावात, नातेवाईकांमध्ये होत होती. याबद्दल श्रीकृष्ण याला संताप यायचा. पत्नी निकिता हिस बालाजीसोबतचे प्रेमसबंध तोडून टाक, असं श्रीकृष्ण सांगत होता. मात्र, बालाजी सोबतच्या प्रेमात अडकलेली निकिता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बालाजीच्या प्रेम प्रकरणावरुन श्रीकृष्ण आणि निकिता यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती.
आपली बायको अर्थात आयुष्याची जोडीदारीन मित्र बालाजी याची झाली आहे, हे श्रीकृष्ण याला खटकत होतं. श्रीकृष्ण याने बालाजी यास समजाविण्याचा प्रयत्न केला. निकिता हिचा नाद सोडून दे, असे बजावले मात्र तोही ऐकत नव्हता. समाजात तर बायकोच्या प्रेमसंबंधावरुन बेअबु्र होत होती. बायको निकिता आणि मित्र बालाजी दोघे ऐकत नव्हते. शेवटी वैतागून श्रीकृष्ण पवार यानेच 31 मार्च 2024 रोजी घराच्या अँगला साडीने गळा आवळून फास घेतला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे.
पित्याने दिली फिर्याद…
श्रीकृष्ण पवार याने 31 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संदर्भात त्याचे वडील विश्वास भिमराव पवार फिर्याद दिली. सून निकिता श्रीकृष्ण पवार आणि बालाजी पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघांनी मिळून आपल्या मुलास शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केली. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. दाखल फिर्यादीवरुन निकिता पवार आणि बालाजी पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भारतीय दंड संहिता कलम 108, 352, 34 (3) गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज अभंग करीत आहेत.
आत्महत्येबद्दल श्रीकृष्ण बोलला होता, पण…
पत्नी निकिता आणि मित्र बालाजी पाटील यांच्यामधील अनैतिक संबंध मृत श्रीकृष्ण पवार याला अजिबात मान्य नव्हते. बालाजी याचा नाद नाही सोडला तर मी आत्महत्या करीन असं भांडणात श्रीकृष्ण बायकोला म्हणत होता. आत्महत्येचा इशारा त्याने अनेकवेळा देऊनसुद्धा बायको निकिता हे बालाजीसोबतचे प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हती, शेवटी त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला असं पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
दोघी चिमुरड्यांचा सांभाळ आजी-आजोबांसह काका करणार
पवार कुंटुबातील राजनंदिनी आणि अमृता या दोघी चिमुरड्या आई-वडिलांपासून पोरक्या झाल्या. त्यांचा सांभाळ आता त्यांचे आजी-आजोबा आणि दोघे चुलते हे करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
चौकट
प्रत्यक्ष पाहण्याबरोबरच कॉल डिटेल्सचा पुरावा
निकिता पवार आणि बालाजी पाटील यांच्यामध्ये मोबाईलवर बोलणं सुरु होतं. याचे कॉल डिटेल्स_ मृत श्रीकृष्ण पवार याने मिळविले होते. शिवाय या दोघांना अनेकवेळा एकत्र श्रीकृष्ण यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. त्यावरुन श्रीकृष्ण हे प्रेमसंबंध असल्याचा दावा करीत होते, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली.
काही हाईलाईटस्…
: संशयित आरोपी निकिता पवार हिस अटक
: संशयित आरोपी बालाजी पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरु
: गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, निकिता आणि बालाजी यांचे
कॉल डिटेल्स तपाण्यात येणार
: संशयित आरोपी बालाजी हा चिंचोली एमआयडीसी परिसरातील
आयशर नामक कंपनीत आहे नोकरीला
: संशयित बालाजी याचे काही दिवसांपूर्वीच झाले आहे लग्न
दोन संसार उद्धवस्त
निकिता आणि बालाजी हे दोघे अल्लड, अल्पवयीन आहेत असं अजिबात नाही. दोघांनाही समज आहे. संसार आहे. निकिता हिला तर दोन मुली आहेत. शिवाय बालाजी याचेपण लग्न झाले आहे. त्यालापण बायको, आई-वडिल, भाऊ वगैरे असे सगळे कुंटुंब आहे. नवर्याच्या आत्महत्या प्रकरणात निकिता जेलमध्ये सडणार त्यातून तिचा संसार उद्धवस्त झाला. शिवाय मित्र श्रीकृष्ण याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरण्याप्रकरणी बालाजी हादेखील तुरुंगात सरकारी पाहुणचार घेणार. त्यातून त्याचाही संसार उद्धवस्त होणार. प्रेम प्रकरणातून दोन संसार उद्धवस्त झाले, हे मात्र नक्कीच.