खास प्रतिनिधी
सोलापूर : पिढ्यानपिढ्या स्वच्छतेचे काम करणार्या पंढरपुरातील मेहतर समाजातील गरीब मनिषा वाघे या महिलेस चक्क 21 लाखांची लॉटरी लागली आहे. त्यातून वाघेंच्या ‘मनिषा’ची लखपती होण्याची ‘मनिषा’ पूर्ण झाली आहे.अस्वच्छतेचे काम करणार्या महिलेचे ‘आयुष्य लखलखलं’ आहे.21 लाखांच्या लॉटरीचं दान पदरात घालून लाडक्या विठुरायाने तिच्या आयुष्याचं सोनं केलं आहे. विठुरायचा पावल्याची प्रतिक्रिया या संबंधित महिलेने दिली आहे. ‘भगवान देता हे तो छप्पर फाडके देता है’चा पंढपुरात अनुभव आला आहे.मेहतर समाजाच्या कुंटुंबात आनंदाला अक्षरश: उधाण आले आहे.
पिढ्यान पिढ्या स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या समाजातील महिला आणि पुरुषांना पंढरपूर शहरातील स्वच्छतेची कामे दिली जातात. मनीषा वाघेला या देखील शहरातील अनेक लोकांच्या शौचालयांच्या स्वच्छतेचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. मनीषा वाघेला यांचे पंढरपुरातील मेहतर गल्लीमध्ये ‘दहा बाय दहा’चे पत्र्याचे घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी विक्री केंद्रातून पन्नास रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकीट काढून त्या विसरुन देखील गेल्या होत्या. परंतु, त्यांनी वृत्तपत्रात आपण खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटाचा नंबर सहज चेक केला तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ध्यानीमनी नसताना त्यांना 21 लाख रुपयांचं बक्षिस लागल्याचे कळाल्याने त्यांना सुखद धक्काच बसला. 21 लाखांची लॉटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
घर खरेदीसह मुलांना देणार चांगल्या दर्जाचं शिक्षण
मनिषा वाघे यांना बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करायचे आहे. आपण आपल्या मुलांना हे काम करावे लागू नये म्हणून चांगले शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे.