बंगळूरू, 20 मार्च (हिं.स.)।बंगळूर येथील एका श्वानप्रेमीं नुकतेच एका श्वानाची खरेदी केली आहे.हा श्वान वुल्फडॉग प्रजातीचा आहे. या श्वानाची किंमत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५० कोटी रूपये इतकी आहे.
बंगळूरच्या एस. सतिश यांनी 4.4 मिलियन पाऊंडना श्वानाची खरेदी केली. त्याची भारतीय चलनात किंमत होते तब्बल 50 कोटी रूपये.
एस. सतिश हे बंगळुरातील एक ब्रीडर (श्वानांच्या विविध प्रजाती जन्माला घालणारे) आहेत. दुर्मिळ श्वानांच्या खरेदी विक्रीचा ते व्यवसाय करतात. एका ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी फेब्रुवारी महिन्यात या श्वानाची खरेदी केली होती. कॅडाबॉम्ब ओकामी असे या वुल्फडॉगचे नाव आहे. हा जगातील एक वुल्फडॉग प्रजातीचा एकमेव दुर्मिळ श्वान आहे. तो वुल्फ आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्या संकरातून जन्माला आला आहे. त्यामुळेच तो जगातला सर्वाधिक महागडा वुल्फडॉग ठरला आहे. त्याचे वय सध्या 8 महिने असून वजन 75 किलो इतके आहे. तर त्याची उंची 30 इंच इतकी आहे.दरम्यान, कॉकेशियन शेफर्ड ही प्रजात त्यांच्या अतुल्य ताकदीसाठी ओळखली जाते. सहसा ही प्रजात जॉर्जिया आणि रशिया अशा थंड प्रदेशात आढळते. लांडगे व इतर वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी प्रामुख्याने या श्वानांचा उपयोग केला जातो.
एस. सतीश हे एक प्रसिद्ध कुत्रा प्रजनक असून, इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे प्रमुख आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी श्वान प्रजनन व्यवसाय सोडला असला तरी आता ते आपल्या दुर्मिळ कुत्र्यांचे प्रदर्शन करून उदरनिर्वाह करतात. त्यात अर्धा तासासाठी 2 लाख 46 हजार 705 रूपयांपासून ते 5 तासांच्या इव्हेंटसाठी 10 लाख 9 हजार 251 रूपये इतकी कमाई ते करतात.सतीश यांनी शेतामध्ये 7 एकरात फार्महाऊस तयार केले आहे. येथे प्रत्येक कुत्र्यासाठी 20 बाय 20 फूट आकाराचे स्वतंत्र रूम आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी येथे 10 फूट उंच भिंती असून हा परिसर 24 बाय 7 सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे.