नवी दिल्ली : भारत आणि चीनमधला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला असतानाच अरुणाचल प्रदेशच्या एका आमदाराने एक खळबळजनक दावा करणारे ट्विट केले आहे. निनाँग एरींग असे या आमदाराचे नाव आहे. त्यांनी दावा केला आहे की चिनी सैनिकांनी भारताच्या 5 नागरिकांचे अपहरण केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरून या पाच जणांचे अपहरण झाल्याचे एरींग यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी याबाबतचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत केले आहे. एरींग यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील 5 जणांचे अपहरण करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीची घटना घडली होती. याला चोख उत्तर देण्याची गरज आहे.
प्रकाश लिंगलिंग नावाच्या व्यक्तीने त्याचा भाऊ प्रसाद रिंगलिग आणि इतर 4 जणांचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अपहरण केल्याची बाब समाजमाध्यमांवर मांडली होती. सेरा-7 भागातून हे अपहरण झाल्याचे त्यांनी म्हटले होते. अन्य एका पोस्टमध्ये अपहरण झालेल्या सर्व तरुणांची नावेही दिली आहेत. तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी या पाच तरुणांची नावे असल्याचे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.
हिंदुस्थान आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे असून सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी 3 सप्टेंबर रोजी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी LAC वरील परिस्थिती नाजूक असल्याचे म्हटले होते.