सोलापूर, 10 मे (हिं.स.)।
प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित मनीषा मुसळे- माने यांच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाने १७ मेपर्यंत मुदत मागितली आहे. त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबली असतानाच पोलिसांनी मनीषा यांची कोठडी मागितली आहे.
पोलिस मंगळवारी (ता. १२) मनीषा यांना न्यायालयात हजर करतील, पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत तपास अधिकाऱ्यांना मनीषा यांच्याकडून ठोस असे काहीच हाती लागले नाही. त्यांच्या घराची झडती घेतल्यावर देखील पोलिसांना काहीही मिळाले नाही. कोठडीत केलेल्या तपासात त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे सध्या मनीषा यांच्याकडे अधिक तपास करून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. या १४ दिवसांत पोलिसांना निश्चितपणे काहीतरी ठोस पुरावे मिळतील आणि मनीषा यांना पुन्हा कोठडीत घेतले जाईल, असा सर्वांनाच विश्वास होता; पण तसे झालेच नाही.