सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)। सोलापूरसाठी १५ ते ३० मे या कालवधीत कोणत्याही स्थितीत विमानसेवा सुरू होणार आहे. याची सुरुवात गोव्यापासून होईल. नंतर मुंबईलाही विमानसेवा सुरू होईल, असे ठाम आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी दिले. आशीर्वाद हे विमानसेवेच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच इतक्या आत्मविश्वासाने व स्पष्टपणे बोलले. विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग गुंतवणूक आणि आयटी पार्क उभारणीला वेग येईल, असेही ते म्हणाले.
गोव्यासाठी लवकरच पहिले उड्डाण होईल, अशी बातमी दैनिक सकाळने ३१ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. प्रशासकीय पातळीवर त्या दिशेने वेगवान हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. हॉटेल सेंटर पॉईटच्या सभागृहात आज जिल्हास्तरीय उद्योग परिषद पार पडले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, मैत्रीच्या अधिकारी प्रियदर्शनी सोनार, सीडबीच्या अधिकारी ऐश्वर्या जाधव, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी चिमाजी राठोड, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम वाखरडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, निर्याततज्ज्ञ श्रीजीत नायर, न्यू इंडिया ॲश्युरन्सचे सुशांत चंदनशिवे उपस्थित होते.