खडकी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले
पुणे, 05 एप्रिल (हिं.स.) : गुजरातच्या जामनगर येथे गुरुवारी वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा वैमानिक जखमी झाला होता. त्यांच्यावर जामनगर येथे प्रथमोपचार केल्यानंतर पुण्याच्या खडकी परिसरातील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या जामनगर एअरफिल्डवरून वायुसेनेच्या जग्वार या दोन आसनी विमानाने गुरुवारी (3 एप्रिल रोजी) रात्री उड्डाण केले. रात्रीच्या मोहिमेदरम्यान 9.40 वाजता हे विमान अपघातग्रस्त होऊन कोसळले. यात फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला, तर जामनगरमधील भारतीय हवाई दलाच्या 224 स्क्वॉड्रनचे ग्रुप कॅप्टन मनीष कुमार सिंग जखमी झाले. मनीष कुमार यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून पुण्याच्या खडकी येथील सैन्य इस्पितळात हलवण्यात आले. दरम्यान हवाई दलाने या अपघाताची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या सूत्रांनी सांगितले की, ग्रुप कॅप्टन मनीष कुमार सिंग यांच्या उजव्या पायाच्या टिबिया आणि फायब्युलाच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्यानंतर आणि आगीत भाजलेल्या जखमांमुळे त्यांच्यावर जामनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यानंतर त्यांना खडकी येथील लष्करी रुग्णालयात (एमएच) दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. खडकी येथील लष्करी रुग्णालय ही सशस्त्र दलांची प्रमुख ऑर्थोपेडिक संस्था आहे. त्यासोबतच पाठीच्या कण्यातील दुखापतींसाठी विशेष सेवा देणारे सैन्य रुग्णालयाचे हे एकमेव केंद्र आहे.