नाशिक, 14 मे (हिं.स.)।
: महाराष्ट्राला जशी सांस्कृतिक परंपरा आहे तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र ती केवळ महाराष्ट्रापुरती सीमित न राहता ती जगाला माहिती हवी यासाठी महाराष्ट्रीयन पदार्थांचे जागतिकीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांनी केले.
गोदाघाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना स्व. मूळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यानात “असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण” या विषयावर विष्णू मनोहर बोलत होते.,
विष्णू मनोहर पुढे म्हणाले की, आपल्याकडे महाराष्ट्रात वेगवेगळे पदार्थ आहेत जसे की नाशिकचा चिवडा वैशिष्ट्यपूर्ण आहे, विदर्भातील खाद्य संस्कृती वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्राचे खाद्य संस्कृती वेगळी आहे अगदी वेगळे सांगायचे झाले तर झुणका भाकर आणि वडापाव हे सुद्धा वेगळी चव देतात. मात्र हे पदार्थ केवळ महाराष्ट्र पुरती मर्यादित आहे जगभरातील लोकांना ती माहिती नाही अमेरिकेचे जर आपण उदाहरण घेतलं. तर भारतीय पदार्थांपैकी त्यांना फक्त छोले भटोरे, पनीर मसाला ,वडा सांबार इत्यादी पदार्थच केवळ माहिती आहे.
मात्र कोकणातला उकडीचा मोदक त्यांना माहिती नाही विदर्भातली मोहाची दारू माहिती वडापाव माहिती नाही हे सर्व पदार्थ जगभरामध्ये कोणालाच माहिती नाही. ही खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. मराठी पदार्थ कसे मागे पडत आहेत किंवा ते विकायला आपण धाडस करत नाही याचे उदाहरण देताना त्यांनी दिल्लीतील चांदणी चौकाची उदाहरण दिले. तिथे इडली सांबार विकणारा एक परप्रांतीय भैय्या डोक्यावर इडली आणि सांभार घेऊन येतो आणि अर्ध्या तासात विकून मोकळा होतो. मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झुणका भाकर का दिसत नाही? किंवा विकायला पुढे का कोणी येत नाही ?
असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. महाराष्ट्रामध्ये जेवढे चटण्यांचे प्रकार आहेत तेवढे जगभरात कुठेच नाहीत असे सांगून त्यांनी भारतीय आहार हा सर्वश्रेष्ठ आणि सात्विक आहे असे जगभरातून सांगितले जाते. असा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. विष्णू मनोहर यांनी भारतीय तसेच महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा सहा हजारांच्या च्या वर मराठी पदार्थ असणारा खाद्य संस्कृती कोष तयार केला असल्याचे सांगितले तसेच त्यांनी आपले वेगवेगळ्या देशांमधील पदार्थांबाबतची माहिती दिली.