खास प्रतिनिधी :
सोलापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या मेळाव्यात पक्षश्रेष्ठींसमोरच नाराजीनाट्य आणि मानापनाचा तमाशा झाला. मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही म्हणून पक्षाचे कार्याध्यक्ष तौफिक शेख हे मेळावा सोडून निघून गेले. दुसरीकडे, व्यासपीठावर महिला पदाधिकार्यांना स्थान दिल्याने महिलांनीही संयोजकांवर खडे फोडत दूर्गावतार घेतला.
पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी हर्षवर्धन पाटील अन् शशिकांत शिंदेंसमोरच मानापनाचा तमाशा झाला. नाराजी नाट्य रंगले. ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या (ता. 12 एप्रिल) सोलापूर दौर्यावर येणार होते. त्या पार्श्वभूमीवर, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा प्रथमच जाहीर कार्यक्रम होता, त्यामुळे गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती.
दरम्यान मेळावा सुरू असताना बसायला खुर्ची दिली नाही; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख हे भरसभेतून निघून गेले. त्यांनी यादरम्यान माध्यमांशी संवाद साधत आरोपाचे तोफगोळे फोडले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पदाधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाची ताकद कमी झाली आहे, असा आरोप शेख यांनी केला, त्यामुळे येत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारासुद्धा कार्याध्यक्ष शेख यांनी दिला.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उद्या सोलापूरच्या दौर्यावर येत आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा आज घडलेला विषय टाकणार आहे, असेही तौफिक शेख यांनी स्पष्ट केले होते. तथापि, शरद पवारांचा सोलापूर दौराच रद्द झाल्याने घडला प्रकार शरद पवारांच्या कानावर घालणे शेख यांना शनिवारी (ता.12) शक्य होणार नाही, हे उघड आहे.
श्रेष्ठींसमोरच रणरागिणींचा चढ्या आवाज संताप एकीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर कार्यध्यक्ष तौफिक शेख हे निघून गेले. दुसरीकडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरच महिला आणि पुरुष पदाधिकार्यांची नाराजी व्यक्त केली. शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख बैठकीतून संतापून निघाले. पक्षात आम्हाला कोणत्याही पद्धतीची सन्मानाची वागणूक मिळत नाही, त्यामुळे मी बैठकीतून निघून जात आहे. त्याचवेळी महिला पदाधिकार्यांकडूनही हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या समोरच चढ्या आवाजातच नाराजी व्यक्त केली.
शहर कार्याध्यक्ष तसेच महिला पदाधिकार्यांनादेखील व्यासपीठावर स्थान दिले जात नाही. तसेच मेळावा घेण्याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली जात नाही. पक्षाचे शहराध्यक्ष आणि ठराविक कार्यकर्तेच पक्षांमध्ये पुढे पुढे करतात, त्यामुळे आम्ही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत. कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत, असेही महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.
: तौफिक शेख, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
टागयर पैलवान की अगली चाल…अजितदादा राष्ट्रवादी..?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख हे या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, पक्षात कोणाचा ताळमेळ नाही, आपली कामेच होत नसतील तर या पक्षात थांबून उपयोग का? अशी भूमिका पैलवान तौफिक शेख यांच्या कट्टर समर्थक आणि कार्यकर्त्यांची आहे. त्याशिवाय या पक्षात काही ठराविक पदाधिकार्यांचे प्राबल्य आहे, ते तौफिक यांना विश्वासात घेत नाहीत, मानसन्मान देत नाहीत, या सगळ्या पार्श्वभूमीवर, तौफीक शेख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत, पक्ष सोडण्याबद्दल त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढतोय, त्यातून ते शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी खाली ठेवत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे ‘घड्याळ’ मनगटावर बांधण्याच्या मनस्थितीत असल्याचा बोलबाला त्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये आहे. तशी चर्चा आहे.