नवी दिल्ली, 29 जुलै – जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर करण्यात आलेल्या टार्गेट किलिंगनंतर सुरू करण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याचे गेम चेंजर ठरले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले.
दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचे कौतुक
राजनाथ सिंह म्हणाले की, “२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येला जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांचा २८ जुलै रोजी सुरक्षा दलांनी यशस्वी खात्मा केला. भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांनी दाखवलेली कार्यक्षमता उल्लेखनीय आहे.”
भारताच्या ‘झीरो टॉलरन्स’ धोरणाला बळकटी
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन सिंदूर केवळ एका कारवाईपुरते मर्यादित नाही, तर हे भारताच्या ‘झीरो टॉलरन्स’ धोरणाचे मजबूत प्रतीक आहे.”
त्यांनी ठामपणे म्हटले की, “या ऑपरेशनला पूर्णविराम नाही, फक्त अल्पविराम आहे.”
पाकिस्तानला टोला – “नागांना रोज दूध पाजायचे नसते”
पाकिस्तानकडून होणाऱ्या अण्वस्त्रांच्या धमक्यांचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले, “नागपंचमीला नागांना दूध पाजणे ठीक आहे, पण रोजच नाही,” असा सूचक टोला त्यांनी लगावला.
दहशतवाद्यांना लक्ष्य, सामान्य नागरिक सुरक्षित
ते म्हणाले की, “ऑपरेशन सुरू करण्याआधी सखोल गुप्तचर माहिती आणि विश्लेषणावर आधारित रणनीती आखण्यात आली होती, जेणेकरून दहशतवाद्यांना लक्ष्य करता येईल आणि पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना हानी पोहोचणार नाही.”
“ईंट का जवाब पत्थर से” – स्पष्ट भूमिका
राजनाथ सिंह म्हणाले की, “भारताची सुरक्षा नीती स्पष्ट आहे – जर कोणी ईंट मारली, तर आम्ही त्याला दगडाने उत्तर देऊ. देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित निर्णय भावनेने नव्हे, तर दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन घेतले जातात.”
भारताची प्रतिमा बदलली – आता ‘सॉफ्ट स्टेट’ राहिला नाही
ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना वाटत होते की भारत हा ‘सॉफ्ट स्टेट’ आहे, जिथे कमी खर्चात मोठा नफा मिळतो. पण आता ही संकल्पना पूर्णपणे खोडून काढण्यात आली आहे. भारताच्या भूमिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदराचे वातावरण निर्माण झाले आहे.”
विरोधकांनाही टीकेसोबत पर्याय द्यावा लागेल
राजनाथ सिंह यांनी विरोधकांकडे पाहून सांगितले की, “सरकारच्या धोरणांवर टीका करणे हा विरोधकांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी पर्याय देणे हेही त्यांचे कर्तव्य आहे.”
सांस्कृतिक संदर्भ – स्वाभिमानाच्या लढ्याची परंपरा
त्यांनी भगतसिंग आणि चंद्रशेखर आजाद यांचा उल्लेख करत सांगितले की, “स्वातंत्र्यसैनिकांनी जसा इंग्रजांविरोधात स्वाभिमानाने लढा दिला, तशीच आजची पिढीही राष्ट्रीय सुरक्षेसाठी झगडत आहे.”