पुणे, 14 सप्टेंबर। शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
यामध्ये आयुषची आजी लक्ष्मी आंदेकर, शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर आणि अभिषेक आंदेकर या चौघांचा समावेश आहे. 19 वर्षीय आयुष कोमकर याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या वर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती, त्यात आयुषचे वडील गणेश कोमकर मुख्य आरोपी आहेत. याच हत्येचा सूड घेण्यासाठी आयुषची हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.
आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी या हत्येमागे आयुषचे आजोबा कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबाचा हात असल्याचा आरोप केला होता.