नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न हा प्रलंबित आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून १२ जागांसाठी नावांची यादी सुपूर्द करण्यात आली होती. यामध्ये, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.
यानंतर, राज्यपालांनी या नावांचा अभ्यास करून त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये भाष्य केलं आहे. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.’ असं म्हणत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेलाच लक्ष्य केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर, ‘या देशाची राज्यघटनेला महत्त्व देत असताना आम्हाला ज्ञान देतात. जर राज्य आणि देश राज्य घटनेनुसार चालावे असं वाटत असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्य घटनेचं पालन केले पाहिजे. राज्य घटनेनं जे अधिकार दिले आहे, त्यानुसार, राज्य कॅबिनेटने जे निर्णय दिले आहे, ते निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतात’ अशा शब्दांत राऊत यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
‘ सहा महिने होत आले, अजूनही निर्णय घेण्यात आला नाही. घटनात्मकपदावर बसून घटनेचे मारेकरी होण्याचे काम तुम्ही करत आहात. एखाद्या विषयाचा अभ्यास करायला किती वेळ लागतो. हे सरकार पाडले जात नाही, माझ्या मनासारखे सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर सह्या करणार नाही. असा जर आदेश किंवा सुचना आल्या असेल तर राज्यपालांनी स्पष्ट करावे, मग त्यानुसार आम्ही लढाई लढू’, असा निर्वाणीचा इशारा देखील संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.