सोलापूर, 3 मे (हिं.स.)।
न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपली. त्यानंतर न्यायालयाने मनीषा यांच्या पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आता आठ दिवस संपले तरीदेखील पोलिसांनी मनीषाला चौकशीसाठी पोलिस कोठडीत घेतलेले नाही.
गुन्ह्याच्या अनुषंगाने मनीषा मुसळे माने यांनी रुग्णालयात फाडलेल्या ई-मेलच्या मूळ प्रतीचे तुकडे पोलिसांना त्याठिकाणी मिळालेले नाहीत. त्यानंतर मनीषा मुसळे माने यांच्या घराची झडती घेतली, त्याठिकाणी देखील पोलिसांना काही सापडले नाही. पोलिस कोठडीत मनीषाकडे सखोल चौकशी केली, पण तिने तपासाला सहकार्य केले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सद्य:स्थितीत मनीषाकडे अधिक तपास करून काहीही निष्पन्न होणार नाही, असे पोलिसांनी सांगून पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यास मान्यता दिली. आर्थिक पुरावे उपलब्ध झाल्यावर मनीषाची पुन्हा पोलिस कोठडी घेतली जाईल, असेही पोलिसांनी न्यायालयास सांगितले होते. पण, आठ दिवस झाले तरीदेखील पोलिसांनी मनीषाला कोठडीत घेतलेले नाही. १४ दिवसानंतर पोलिस पुन्हा मनीषा यांची कोठडी वाढवून घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.