सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)।
राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवून गावातील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे. या अभियानात हालगर्जी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने दि. १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.” कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” वाटचाल दृष्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या नावाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या २९ एप्रिल रोजी सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक बोलाविण्यात आलेली आहे.
गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणेसाठी ग्रामीण जनतेच्या स्वच्छता विषयक वर्तणूकित बदल घडवून आणण्यासाठी हे या अभियानाचे मुख्य उदिष्ट आहे. गावातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून सार्वजनिक स्वच्छताविषयक बाबीची लोकांमध्ये जाणीव जागृती करणे, घनकचऱ्याचा पुनर्वापर करणे, पर्यावरण पूरक उपाय योजना करणे साठी १३८ दिवसाचे हे विशेष अभियान सुरु केले आहे.या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेवून तालुकानिहाय नियोजन सादर करणेबाबत आदेशित केले आहे.