पुणे, 9 एप्रिल (हिं.स.)।बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की आम्ही रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करतो आहोत पण याची दखल घेतली जात नाही, तारीख पे तारीख दिली जात आहे. असं त्यांनी सांगितले.
पुढे बोलना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेली डेडलाइन मागेच उलटून गेली. परंतु अद्यापही तेथे रस्त्याचे कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हा रस्ता भाविकांना ये-जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.