सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पडताळणी करताना काही लाभार्थींनी लाभासाठी दोन-दोन आधारकार्ड अपलोड केल्याचे तर दुसरीकडे १९, २० वयोगटातील तरुणींनी वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्याचे दाखविण्यासाठी आधारकार्डवरील तारखा बदलल्याचेही प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक निकषांची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय पुढील लाभ मिळणार नाही, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असून राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या अडीच कोटींपर्यंत आहे. आता महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का याची माहिती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. तत्पूर्वी, चारचाकी वाहन असलेले, एकापेक्षा जास्त वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभ घेणाऱ्या महिला योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या.