न्यूयॉर्क : जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अखेरीस डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचीच सरशी झाली. अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना बहुमतासाठीचा 270 इलेक्टोरल मतांचा टप्पा ओलांडता आला. अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून बायडेन हे शपथ घेतील. कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या पहिल्या महिला कृष्णवर्णीय उपाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे.
गेले काही दिवस रखडलेला अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमिरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन जिंकल्याचं जाहीर केलं आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या अपडेटनुसार ट्रम्प यांना 214 पर्यंतच मजल मारता आली, तर बायडन यांनी 284 पर्यंत आकडा गाठला आहे. व्हिस्कॉन्सिन, पेनसिल्वेनिया, मिशिगन अशा स्विंगिंट स्टेट्समध्ये ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला आणि याच राज्यांमुळे बायडन यांचा विजय निश्चित केला.
जो बायडेन यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांनी अनेक बाबतीत इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या महिलेला हा सन्मान मिळाला आहे.
बायडेन यांच्या विजयानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून एकच जल्लोष करायला सुरूवात केली आहे. पेनसिल्व्हानियाची इलेक्टोरल मते ही २० एवढी असल्याने बायडेन यांनी येथे बाजी मारताच त्यांचा विजय अधिक सुकर झाला.
विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हा विजय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले आहे. आम्ही याविरोधात न्यायालयामध्ये खटला भरू, असेही ट्रम्प यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या निकालानंतर बायडेन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” मी सर्व अमेरिकींचा अध्यक्ष म्हणून काम करेल. आपल्या महान देशाचे नेतृत्व करण्याचा सन्मान तुम्ही मला दिला आहे. आपल्या समोरचे काम हे कठीण आहे. तुम्ही मला मतदान केले असेल अथवा नसेल, मी तुम्ही दाखविलेल्या विश्वासाला जागेन.” या निकालानंतर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी बायडेन यांच्या भोवतीचे सुरक्षा कवच अधिक भक्कम करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे बायडेन विजयी झाल्यानंतर देखील पेनसिल्व्हानिया, अॅरिझोना, नेवाडा आणि जॉर्जिया या राज्यांतील मतमोजणी सुरू होती.
* जो बायडन यांच्याविषयी
1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडन पहिल्यांदा सीनेटर झाले होते. त्या आधी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता. बियू आणि हंटर ही त्यांची मुलंही त्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर बायडन कोलमडून गेले होते. त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार घोळत होते. आता जगण्यात अर्थच राहिलेला नाही त्यामुळे जगून तरी काय फायदा असं त्यांना वाटत असे. मात्र या नैराश्यावर मात करत ते पुन्हा उभे राहिले. नंतर बराक ओबामा यांचे ते जवळचे सहकारी झाले. ओबामा अध्यक्ष असताना बायडन हे उपाध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांचा मुलगा बियू याचा ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा हंटर याला कोकेन बाळगल्या प्रकरणी नौदलातून काढून टाकण्यात आलं होतं. 1988मध्ये ते अर्धांग वायूच्या आजारातूनही बाहेर आले. अशा अनेक संकटावर मात करत आता बायडेन यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
77 वर्षांच्या बायडन यांच्यावर गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशझोत असला तरी त्यांनी आयुष्याच्या सुरूवातीला अतिशय कष्टात दिवस काढले आहेत. बायडन यांचे मित्र जिम कॅनडी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की जो यांनी जे कष्ट भोगले ते कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. त्यामुळे ते एवढे खंबीर बनले की एकदा ठरवल्यावर ते ती गोष्ट केल्याशिवाय राहात नाहीत.
* पावसातली सभा, पवारांची आठवण
ज्यो बायाडन यांनी प्रचारसभेत भरपावसात जनतेस संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील सातारा येथील शरद पवारांच्या सभेशी तुलना केली गेली. त्यावेळी महाराष्ट्रासारखी अमेरिकेतही जादू होऊन सत्तांतर होईल का? अशी चर्चाच देशभर झाली. ही सभा साता-यासारखी खूपच गाजली.
कोळशांच्या खाणी आणि मोठ मोठाली यंत्र यांच्या सहवासात त्यांचं बालपण कष्टात गेलं होतं. लहान असताना बोलण्यात ते अडखळत असत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा अपमानही केला होता. नंतर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. ‘प्रॉमिस टू कीप’ हे त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारं लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे.