नायजेरिया : नायजेरियाच्या एका गावात बोकोहराम या दहशतवादी संघटनेने तब्बल 110 शेतकऱ्यांची हत्या करत मोठा नरसंहार केला आहे. नायजेरियातील संयुक्त राष्ट्राच्या समन्वयक एडवर्ड कोलन यांनी ही माहिती दिली आहे.
आधी मृतांची संख्या 43 आणि नंतर 70 सांगण्यात आली. मात्र, आता ही संख्या 110 पर्यंत पोहचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी या गावातील महिलांचं अपहरण केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संबंधित शेतकरी आपल्या शेतांमध्ये काम करत असताना गाड्यांवर आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जवळपास 110 नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या गावातील अनेक महिलांचं अपहरण देखील झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्ला या वर्षातील सर्वसामान्य नागरिकांवर झालेला सर्वात हिंसक हल्ला आहे, असं मत संयुक्त राष्ट्राचे समन्वयक एडवर्ड कोलन यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दोषींना या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची मागणी केली.
या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, मागील वर्षभरात बोको हरामकडून या भागात अनेकदा असे हल्ले झाले आहेत. नागरिकांनी देखील याच संघटनेवर आरोप केला आहे. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी मागील दशकात जवळपास 30 हजार सामान्य नागरिकांची हत्या केली आहे. तसेच जवळपास 20 लाख लोकांना जीवाच्या भीतीने या भागातून विस्थापन करावं लागलं आहे.
बॉर्नोचे गव्हर्नर उमारा झुलुम यांनी नायजेरिया सरकारला शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी या भागात अधिक जवानांची तैनाती करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांना सिव्हिल डिफेन्स फायटरमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
नायजेरियाचे अध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी नागरिकांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटी भरुन काढण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच या नरसंहाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘बॉर्नो राज्यात दहशतवाद्यांकडून आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. या निर्घृण हत्येने संपूर्ण देशाला धक्का बसलाय.’