माढा : गेल्या काही दिवसापर्यंत विविध मोठ्या शहरात फैलाव झालेल्या कोरोनाचा आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असून माढा तालुक्यामध्ये आज शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात नुसार 21 रूग्ण नव्याने कोरोनाबाधित आढळले. यामुळे तालुक्यात 62 इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. आजच्या 21 रुग्णामुळे माढा तालुक्यात दुर्दैवाने अर्धशतक पार केले आहे.
आज आढळलेल्या 21 मध्ये कुर्डूवाडी 8, अकोलेबुद्रुक 2, रिधोरे 7 , उंदरगाव 3 तर माढा शहरातील एका रूग्णांचा समावेश आहे. कालपर्यंत निरंक असलेल्या माढा शहरात कुर्डूवाडी येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या माढ्यातील उच्चभ्रू वसाहतीतील शिक्षकांच्या रूपाने कोरोनाने शिरकाव केला. याच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने संपर्कात आलेल्या त्या शिक्षकाचा 16 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.
आजपर्यंत रिपोर्ट येईपर्यंत तो माढा शहरात फिरला असल्याने माढेकरांचे टेन्शन वाढले आहे. त्याच्या घरातील व बाहेरील मिळून 7 लोकांची रॅपिड अॅटिजन पद्धतीने तात्काळ तपासणी करणार असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. कालच कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी माढा शहर उद्यापासून आठ दिवसांसाठी लाॅकडाऊन करण्यात आले होते. मात्र आज सकाळीच शहरात रूग्ण सापडल्याने दुपारी 1 वाजल्यापासून नगरपंचायतीने शहर बंदचा निर्णय घेतला.
दरम्यान आज सकाळीच श्रीरामनगर परिसर माढा नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने सील केला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अधिकारी डाॅ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कादबाने, मुख्याधिकारी चरण कोल्हे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सदानंद व्हनकळस आदींनी पाहणी केली. यासाठी स्वच्छता निरीक्षक शिवाजी सांगळे, आरोग्य विभाग प्रमुख गणेश बागल, पोलीस पांडुरंग देशमुख, संजय घोळवे, शिवाजी सावंत, किशोर ढावरे, निलेश बंडगर आदी परिश्रम घेत आहेत.