मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने (Mahayuti) मुख्यमंत्री लाडकी बहीणसह (CM Ladki Bahin Yojana) अनेक योजनांची घोषणा केली होती. मात्र, अवघ्या तीन-चार महिन्यात असल्याने या योजना राबवणार कधी आणि त्याचा प्रचार करणार कधी, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे उभा ठाकला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत अस्तित्त्वात येणे अपेक्षित आहे. मात्र, महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने नुकताच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तेव्हाच महाराष्ट्रातील निवडणूक लांबणीवर पडेल, असे संकेत मिळाले होते. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होईल, असा अंदाज होता. दिवाळीचा सण आटोपल्यानंतर मतदान पार पडेल आणि 15 ते 16 नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होईल. जेणेकरून 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्त्वात येईल, असा अंदाज होता. मात्र, आता निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात घेईल, अशी माहिती समोर आली आहे. या काळात महायुती सरकारला लाडकी बहीणसह अन्य योजनांचा पुरेपूर प्रचार करण्यास वेळ मिळेल. यावर महाविकास आघाडी याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.