नवी दिल्ली : तुमच्याकडूनही कधी चुकून फोनमधून एखादा कॉन्टॅक्ट डिलिट झाला असेल. एखादा कॉन्टॅक्ट डिलिट झाल्यावर रिकव्हर करणं कठीण असतं. पण आता Google Contacts एक नवीन फीचर आणत आहे. याद्वारे डिलिट झालेले कॉन्टॅक्ट पुन्हा रिकव्हर करता येतील.
नवीन फीचरला Trash नाव दिलं आहे. हे फीचर रिसाइकल बिनप्रमाणेच काम करतं. म्हणजे जर तुम्ही गुगल कॉन्टॅक्ट्सचा वापर करत असाल आणि चुकून कधी एखादा कॉन्टॅक्ट डिलिट केला तर तो कॉन्टॅक्ट तुम्ही 30 दिवसांमध्ये रिकव्हर करु शकाल. पण सध्या हे फीचर फक्त Google Contacts च्या वेबसाइटवर उपलब्ध झालं आहे, अद्याप अॅपवर हे फीचर आलेलं नाही.
पुढील काही आठवड्यांमध्ये हे फीचर सर्व G Suite ग्राहकांसाठी आणि पर्सनल गुगल अकाउंट्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे. Google Contacts च्या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला Other contacts च्या खाली Trash फीचर मिळेल. ज्यांना हे फीचर दिसेल ते डिलिट केलेले कॉन्टॅक्ट तिथे पाहू शकतात. त्या कॉन्टॅक्टबाबत युजरला Delete Forever किंवा Recover असे दोन पर्याय मिळतील. गुगल कॉन्टॅक्ट्सच्या contacts.google.com या वेबसाइटवर हे फीचर उपलब्ध आहे, मात्र अद्याप अॅपसाठी हे फीचर रोलआउट करण्यात आलेलं नाही.