उस्मानाबाद : पाकिस्तानमधील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेल्या उस्मानाबाद येथील एका 20 ते 22 वर्षीय तरुणाला भारत – पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे. उस्मानाबाद पोलिसांचे एक पथक सदरील तरुणास ताब्यात घेण्यास रवाना झाले आहे. सोशल मिडीयावरून पाकिस्तानमधील एका मुलीशी ओळख झाली. त्यांचे प्रेम इतके वाढले की गदर चिञपटातील सन्नी देवोलसारखा हाही पाकिस्तानला जायला निघाला. असे धाडस करणे त्यांच्या अंगलट आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील ख्वाजा नगर भागातील झिशान सिध्दिकी असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकेनिकल इंजीनियरिंगमध्ये शिकत आहे. त्याचे वडील येथील एका मस्जिदमध्ये मौलाना आहेत. सोशल मिडीयावरून पाकिस्तानमधील एका मुलीशी ओळख झाली. त्यांचे प्रेम इतके वाढले की गदर चिञपटातील सन्नी देवोलसारखा हाही पाकिस्तानला जायला निघाला. असे धाडस करणे त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. दररोजच्या चॅटिंगमधून दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. प्रेमात वेडा झालेल्या झिशानला कोरोनाचे काय, भारत-पाकिस्तान सीमांचेही भान राहिले नाही.
थेट पाकिस्तानमध्ये निघालेल्या या तरुणाला सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत – पाक सीमेवर काल गुरुवारी रात्री 9.30 वाजता पकडले. पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. गुजरातमधील कच्छजवळ त्याला पकडण्यात आले. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.
उस्मानाबादचा हा तरुण पाकिस्तानमध्ये निघाल्याची माहिती कळाल्यावर उस्मानाबाद पोलिस, एटीएस, सायबर, औरंगाबाद , मुंबई एटीएस टीम कार्यान्वीत झाल्या. त्याचा लॅपटॉप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी गुजरातकडे रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.