सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त,जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त यांना लॉकडाऊन विरोधात शंभूराजे युवा संघटनेने केलेल्या दाव्यात न्यायालयात येत्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहर व नजीकच्या तालुक्यात 16 जुलै ते 26 जुलै असे दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊन विरोधात शंभुराजे युवा संघटन महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चव्हाण, सचिव अभिजीत पवार यांचे वतीने सोलापूर न्यायालयात दावा दाखल केला आहे. सदर दाव्याची आज शनिवारी सुनावणी होऊन सोलापूर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सोलापूर महापालिका आयुक्त या तिघांना कोर्टात हजर राहण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.
शंभुराजे युवा संघटन महाराष्ट्र संघटनेच्यावतीने ॲड. संतोष होसमनी यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी केलेल्या आदेशाविरोधात स्थगिती मिळावी म्हणून युक्तिवाद केला. 70 दिवस लॉकडाऊन आणि संचारबंदी केली होती. या दरम्यान प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. लॉकडाऊन असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तरी देखील पुन्हा लॉकडाऊन करणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद केला.
पूर्वी केलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खाजगी, क्षेत्रातील कामगार,हातावर पोट असणारे तसेच मोलमजुरी करून खाणारे कामगार यांचे अतोनात हाल झाल्याचेही म्हटले.
याबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता करता लॉकडाऊन करणे चुकीचे असल्याचे युक्तिवादात म्हटले.
यावर न्यायालयाने 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहरातील कामगार वर्ग जनतेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा दावा दाखल केला असून या लॉकडाऊन विरोधातील दाव्यात आपले म्हणणे मांडायचे असेल तर शंभुराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चव्हाण, सचिव अभिजित पवार, एडवोकेट एस. डी. होसमनी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.