अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुक येथील श्री मल्लिकार्जुन ज्युनिअर कॉलेजची दिव्यांग (अंध )विद्यार्थिनीने एच.एस.सी. (१२ वी ) बोर्ड परीक्षेत तब्बल ८३.६९ टक्के गुण मिळवून करजगी केंद्रात प्रथम आली आहे. हे यश कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणादायी आहे.
कुंती शिरशाड ही जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. तिच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता यावे म्हणून तिच्या पालकांनी तिच्या नंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही. कुंती ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. दहावीपर्यंत ती नियमित शाळेत जात होती. मुंबईच्या नँब संस्थेकडून आठवीपासून तिचे पालकांनी अभ्यासाची आँडिओ कँसेट मागविले. तिच्या अभ्यासात तिचे आई व वडिल दोघेही मदत करायचे. अभ्यासासोबतच कुंती ही कविताही लिहिते. शिवाय संगिताच्याही परीक्षा देत आहे.
तिला ब्रेल वाचनाची आवड असून ती स्पर्शज्ञान व रिलायंस दृष्टि ब्रेल पाक्षिकांची नियमित वाचक आहे. तिचा आत्मविश्वास व जिद्द प्रेरणादायी आहे. कुंतीला दहावीला ८५ टक्के गुण मिळाले होते. स्वयंअध्ययन करून तिने हे यश मिळविले आहे. लेखनिकच्या मदतीने तिने परीक्षा दिली होती. कुंतीच्या या यशात तिच्या शिक्षकांबरोबरच तिची आई सरोजनी आणि वडील साहेबगोंडा शिरसाड यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भविष्यात तिला कलेक्टर व्हायचं आहे.
यापुढील शिक्षणासाठी कुंती मुंबई मधील महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. या पुढील महाविद्यालयीन परीक्षा लेखनिकाच्या मदतीशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:च लिहिण्याचा निर्धार तिने केला आहे. आता पुढे काय करणार असे विचारल्यावर ‘सुराज्य डिजिटल’शी बोलताना ती म्हणाली मला भविष्यात आयएस व्हायचे आहे. आतापासूनच स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरूवात केली आहे. पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवून माझ्या सारख्या गरजुंना मदत करायची आहे. अंध व्यक्तींना उपयोगी पडतील अशी ‘ब्रेलमी’ आणि ‘किबो रीडर’ यांसारखी अत्याधुनिक साधने लाॅकडाऊन उठताच घेण्याची तयारीही तिच्या आईंनी दर्शवली. ते तिच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठविणार आहेत.
” एकुलती एक मुलगी आहे. तिला स्टँन्ड करण्यासाठी आम्ही दुसरे अपत्य होऊ दिले नाही. मुंबईच्या नँब संस्थेकडून रेकॉर्डिंग मागवत होतो. ते ऐकून ऐकून अभ्यास करायची. आई वडील दोघेही मदत करत आहोत. मुंबईचे स्वागत थोरात यांचीही खूप मोलाची मदत होत आहे.”
– साहेबगौडा शिरसाड, कुंतीचे वडील